Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
८ महिन्यांच्या बिबट्याने ५० जणांना झुंजवलं; पोलीस वनविभाग महानगरपालिका आणि रेस्क्यू टीमला ३ तास पळवलं, अमरावतीतील व्हिडीओ व्हायरल

८ महिन्यांच्या बिबट्याने ५० जणांना झुंजवलं; पोलीस वनविभाग महानगरपालिका आणि रेस्क्यू टीमला ३ तास पळवलं, अमरावतीतील व्हिडीओ व्हायरल

Young Leopard Creates Chaos In Amravati: अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात एका आठ महिन्यांच्या बिबट्यानं अक्षरश: धुमाकूळ घातला. या बिबट्यानं जवळपास ५० लोकांना ३ तास झुंजवलं. लोकं त्याला पकडण्यासाठी सैरावैरा पळत होते.

पण तो कोणाच्याच हाती लागत नव्हता. या रेस्क्यु ऑपरेशनचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बिबट्या हा किती खतरनाक शिकारी आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. सोशल मीडियावर तुम्हाला ढिगभर व्हिडीओ पाहायला मिळतील, ज्यामध्ये बिबट्या लोकांच्या घरांमध्ये शिरून शिकार करताना दिसतो. बिबट्यानं घातलेल्या अशाच एका गोंधळाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा बिबट्या अमरावतीमधील रामपुरी कॅम्प परिसरात शिरला होता. त्याला पकडताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला. पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी, रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिक असे मिळून जवळपास ५० जण या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण तो कोणालाच दाद देत नव्हता. या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही.बिबट्या कोणालाच ऐकत नव्हता​



तर घडलं असं की, रामपुरी कॅम्प या दाट लोकवस्तीच्या परिसरात एक बिबट्या फिरताना स्थानिकांना दिसला. हा बिबट्या शिकार करण्याच्या उद्देशानं वस्तीत फिरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सुदैवानं लगेचच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला. लक्षवेधी बाब म्हणजे हा बिबट्या ९ ते १० महिन्यांचा आहे. त्यामुळे त्याला सहज पकडता येईल, असा विश्वास वनविभागाला होता. पण तो अपेक्षेपेक्षा जास्तच चपळ निघाला. अखेर त्याला पकडण्यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि स्थानिकांचीही मदत घेण्यात आली. पण तरीदेखील त्यानं तब्बल ३ तास सर्वांना पळवलं. झाडांवरून आणि घरांच्या छपरांवरून उड्या मारत तो रेस्क्यू टीमला चकवा देत होता. अखेर फिशिंग नेटचा वापर करून बिबट्याला पकडण्यात आलं.
रामपुरी कॅम्प परिसरात भीतीचं वातावरण​



या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नाही आणि बिबट्यालादेखील सुरक्षितरित्या पकडण्यात आलं. आता वनविभागाची टीम त्या बिबट्याला दूर जंगलात सोडून देणार आहे. मात्र, या प्रकरणामुळे रामपुरी कॅम्प परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण एकदा आलेला बिबट्या पुन्हा येईल, अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.
बिबट्या पुन्हा गावात शिरला तर? ​



अमरावती शहराचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी लोकांना घाबरू नका, असं आवाहन केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बचाव पथकाने बिबट्याला पकडलं आहे आणि पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाईल. मात्र, वास्तवात बिबट्यांना रोखणं हे निश्चितच कठीण काम आहे. कारण जंगलं कमी झाल्यामुळे प्राण्यांच्या शिकारीचं क्षेत्र कमी होत चाललं आहे. किंबहुना आता मानवी वस्तीच हळूहळू जंगलामध्ये शिरत आहे. त्यामुळे प्राणी वस्तीत शिरून हल्ले करताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्हीदेखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims