Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Aaple Sarkar Portal Closed: 'आपले सरकार' पोर्टल बंद; महा-ई-सेवाचे कामकाज खोळंबले, राज्यभरातील विद्यार्थ्यांसह नागरिक संतप्त

Aaple Sarkar Portal Closed: 'आपले सरकार' पोर्टल बंद; महा-ई-सेवाचे कामकाज खोळंबले, राज्यभरातील विद्यार्थ्यांसह नागरिक संतप्त

. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: गेल्या पाच दिवसांपासून आपले सरकार पोर्टलमध्ये तांत्रिक दोष आल्याने राज्यभरातील महा-ई-सेवा केंद्रांचे ऑनलाइन कामकाज ठप्प झाले आहे. प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक व इतर दाखले मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

तर नागरिकांच्या प्रश्नांच्या भडीमारामुळे महा-ई सेवा केंद्र संचालक पेचात सापडले आहेत.

महा-ई-सेवा केंद्रांचे पोर्टल लॉगिन होत नसल्याने पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. परिणामी उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास, नॉन-क्रिमिलेअर, ईडब्ल्यूएससह विविध दाखल्यांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो अर्ज प्रलंबित आहेत.

दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला. आता बारावीचा निकालदेखील जाहीर झाला आहे. शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत आहे. विशेषतः दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बँकिंग, न्यायालयीन, मालमत्ता, शैक्षणिक तसेच इतर अनेक कामांसाठी आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे आपले सरकार पोर्टलची सेवा बंद असल्यामुळे मिळणे कठीण झाली आहे. पोर्टल बंद असल्याने आम्ही कोणतीही प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही, असे उत्तर नागरिकांना ऐकावे लागते.

डिजिटल सेवांप्रति नाराजी
राज्य शासनाने डिजिटल सेवांचा मोठा गाजावाजा केला. ऑनलाइन सुविधा देण्याबाबत जनतेला आश्वस्त केले. मात्र, मुख्य पोर्टलच अचानक बंद पडले. ते आजपर्यंत सुरू झाले नाही. सेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत असली तरी त्यांना योग्य सेवा मिळत नसल्याने नाराजी वाढली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims