Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Abhinandan Varthaman : 'वीर चक्र' विजेते अभिनंदन वर्धमान वायुसेनेतून निवृत्त, खाजगी विमान कंपनीत नोकरी, कशी असते प्रक्रिया?

Abhinandan Varthaman : 'वीर चक्र' विजेते अभिनंदन वर्धमान वायुसेनेतून निवृत्त, खाजगी विमान कंपनीत नोकरी, कशी असते प्रक्रिया?

वी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे माजी ग्रुप कॅप्टन आणि 'वीर चक्र' विजेते अभिनंदन वर्धमान निवृत्त झाले आहेत. त्यांनी एका खाजगी विमान कंपनीत नोकरी स्वीकारली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ३१ मार्च २०२६ रोजी वायुसेवेतून निवृत्ती घेतली.

'पीटीआय' वृत्तसंस्थेनुसार, अभिनंदन वर्धमान यांनी ऑगस्ट महिन्यात 'FLY91' या खाजगी विमान कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तिथे ते व्यावसायिक प्रवासी विमानांचे पायलट म्हणून काम करणार आहेत. वायुसेनेत जवळपास दोन दशके सेवा बजावल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीतील हा एक नवीन टप्पा आहे.

२७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानचे 'एफ-१६' हे लढाऊ विमान पाडल्यानंतर अभिनंदन चर्चेत आले होते. या कारवाईदरम्यान त्यांच्या 'मिग-२१' विमानाला क्षेपणास्त्राचा फटका बसला, त्यामुळे त्यांना विमानातून इजेक्ट व्हावे लागले आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले होते. सुमारे ६० तास आपल्या ताब्यात ठेवल्यानंतर पाकिस्तानने १ मार्च २०१९ रोजी त्यांना भारताकडे सोपवले होते.

वायुसेवेतून निवृत्त पायलट एअरलाईन्स कसे काम करू शकतात?

वायुसेवेतून निवृत्त झालेले पायलट नागरी विमान वाहतूक क्षेत्रात (सिव्हिल एव्हिएशन) जाऊ शकतात. यासाठी त्यांना 'डीजीसीए' च्या नियमांनुसार सिव्हिल पायलट लायसन्स, आवश्यक प्रशिक्षण आणि वैद्यकीय पात्रता या अटींची पूर्तता करावी लागते. या प्रक्रियेत लष्करी विमान उड्डाणाचा अनुभव फायदेशीर ठरतो.

एअरबस, बोईंग किंवा कोणतेही विशिष्ट विमान उडवण्यासाठी आवश्यक असलेली 'टाइप रेटिंग' आणि विशिष्ट प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे असते. 'डीजीसीए'च्या नियमांनुसार नागरी परवान्यासाठी लष्करी उड्डाणाचा अनुभव ग्राह्य धरला जाऊ शकतो.

एअरलाइन पायलटसाठी वयोमर्यादा काय?

भारतात व्यावसायिक हवाई वाहतुकीसाठी पायलटचे कमाल वय ६५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वयाच्या ६० ते ६५ वर्षांच्या दरम्यान 'मल्टी-क्रू ऑपरेशन'ची अट लागू होते; याचा अर्थ सह-पायलटचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पायलट व्यावसायिक हवाई वाहतुकीची विमाने उडवू शकत नाहीत.

पायलटला आवश्यक परवाने आणि वैद्यकीय पात्रता कायम ठेवावी लागते. तसेच त्यांना जी विमाने उडवायची आहेत, त्यासंबंधीची विशिष्ट पात्रता असणे आवश्यक असते. याव्यतिरिक्त, संबंधित विमान कंपनी भरती आणि सेवेच्या अटींबाबत स्वतःचे नियम ठरवू शकते.

पुलवामा हल्ल्यानंतर राबवलेली मोहीम

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला, त्यामध्ये ४० जवान शहीद झाले. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला.

दुसऱ्या दिवशी, पाकिस्तानची अनेक लढाऊ विमाने नियंत्रण रेषेच्या दिशेने सरकली. त्यावेळी अभिनंदन हे श्रीनगर एअर फोर्स स्टेशनवर 'मिग-२१ बायसन' स्क्वॉड्रनसोबत तैनात होते आणि 'ऑपरेशनल रेडीनेस' या कर्तव्यावर होते.

पाकिस्तानी विमाने निदर्शनास आल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच, त्यांना रोखण्यासाठी अभिनंदन यांना तातडीने रवाना करण्यात आले. त्यांनी माघार घेणाऱ्या शत्रूच्या विमानाचा पाठपुरावा केला आणि हवाई लढाईदरम्यान ते विमान पाडले.

हवाई लढाईदरम्यान, पाकिस्तानी विमानाने 'बियॉन्ड व्हिज्युअल रेंज' क्षेपणास्त्रे डागली. यापैकी एका क्षेपणास्त्राचा फटका अभिनंदन यांच्या विमानाला बसला. विमानाचे नुकसान झाल्यानंतर अभिनंदन यांनी 'इजेक्ट' केले. ते पॅराशूटद्वारे पाकिस्तानच्या हद्दीत उतरले, तिथे त्यांना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. मात्र १ मार्च २०१९ रोजी ते पाकिस्तानातून सुखरूप भारतात परतले.

अभिनंदन यांना शौर्यासाठी 'वीर चक्र'

या कामगिरीसाठी अभिनंदन यांना २०२१ मध्ये 'वीर चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले. 'वीर चक्र' हा भारताचा युद्धाच्या काळातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे; हा पुरस्कार 'परमवीर चक्र' आणि 'महावीर चक्र' यांनंतरच्या श्रेणीत येतो.

भारत सरकारच्या राजपत्रात प्रकाशित झालेल्या प्रशस्तिपत्रानुसार, पाकिस्तानी विमानांची संख्या आणि तंत्रज्ञान श्रेष्ठ असूनही अभिनंदन यांनी धैर्याने त्यांचा सामना केला. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शत्रूच्या विमानांची रणनीती विस्कळीत झाली.

FLY91 एअरलाइनची गोवा आणि हैदराबाद येथे बेस

FLY91 ही एक प्रादेशिक एअरलाइन आहे. त्यांनी मार्च २०२४ मध्ये व्यावसायिक सेवा सुरू केली. ही कंपनी हवाई सेवेद्वारे लहान शहरांना जोडण्यावर आणि प्रादेशिक संपर्क व्यवस्था सुधारण्यावर भर देते. या एअरलाइनच्या ताफ्यात सध्या सहा 'ATR 72-600' विमाने आहेत. ही टर्बोप्रॉप विमाने कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरली जातात आणि त्यात सुमारे ७० प्रवाशांची क्षमता असते. FLY91 ची गोवा आणि हैदराबाद येथे दोन मुख्य केंद्रे (बेसेस) आहेत. या केंद्रांमधून एअरलाइन विविध प्रादेशिक शहरांदरम्यान विमानसेवा चालवते.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims