कोलकाता: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आहे. सुरक्षा रक्षकांची चपळाई आणि धाडस दाखवत त्यांना हेल्मेट घातलं आणि त्यांच्या भोवती कडं करत त्यांना सुरक्षित स्थळी नेलं.
यावेळी तिथे असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी बॅनर्जी यांच्या विरोधात 'चोर-चोर' अशा घोषणा दिल्या. पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
सोनारपूरच्या कमराबाद परिसरात अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला. तृणमूलचे खासदार असलेले बॅनर्जी शनिवारी संध्याकाळी त्यांच्या पक्षाच्या एका मृत कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. संध्याकाळी साडे चारच्या सुमारास अभिषेक बॅनर्जी कमराबादला पोहोचले. तेव्हा तिथे आधीपासून भाजपचे नेते, कार्यकर्ते हजर होते. यावेळी महिला कार्यकर्त्यांना पुढे ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या हातात अंडी होती.
जमाव मोठा असल्यानं आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं अभिषेक बॅनर्जी यांनी स्वत:ची कार सोडून दुचाकीवरुन परिसरात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आंदोलकांनी पीडित कुटुंबाच्या घरापासून १०० मीटर अंतरावर त्यांना रोखलं. उपस्थितांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी चोर-चोर अशा घोषणा दिल्या. यावेळी संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर दोन दुचाकी फेकल्या. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
आम्ही मजूर आहोत. आम्ही कोणत्याही पक्षाचे सदस्य नाही. आमच्या परिसरात रस्ता झाला नाही. जितका पैसा वरुन आला, तो खाण्यात आला. त्यामुळे आम्ही आजही त्रस्त आहोत. याच कारणामुळे आम्ही संतप्त आहोत, असं स्थानिकांनी सांगितलं. आम्ही भाजपच कार्यकर्ते नाहीत. आम्ही इथले स्थानिक आहोत, असं दुसऱ्या एका आंदोलकानं सांगितलं.
अभिषेक बॅनर्जींविरोधात इतका संताप का?
अभिषेक बॅनर्जींनी भेट दिलेल्या परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. जवळपास १ किलोमीटरचा पट्टा खराब स्थितीत आहे. पावसाच्या दिवसांत इथे पाणी साचतं. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांच्याकडे विनंती अर्ज करण्यात आले. रस्ते दुरुस्त करा. पाण्याची व्यवस्था सुधारा, यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. पण त्यांचं सरकार असताना मूलभूत समस्या सुटल्या नाहीत, असा स्थानिकांचा दावा आहे. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांचे भाचे असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

