Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Accident News: पोलादपूर कार अपघातात दापोलीची गुणवंत कन्या हरपली, बॅडमिंटनपटू अनुश्रीची भरारी अर्धवट, आईसह देवाघरी गेली

Accident News: पोलादपूर कार अपघातात दापोलीची गुणवंत कन्या हरपली, बॅडमिंटनपटू अनुश्रीची भरारी अर्धवट, आईसह देवाघरी गेली

प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सुवर्णा मरकड (वय 42) व अनुश्री मरकड (वय15 )या मायलेकींच्या जागीच मृत्यू झाला आहे.

तर वडील अनिल मरकड हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर इयत्ता दुसरीत असलेल्या चिन्मय हा अपघातात सुदैवाने सुखरूपरित्या बचावला आहे. या भीषण अपघातामुळे कुटुंब क्षणार्धात उध्वस्त झाले आहे.

अनुश्री होती बॅडमिंटनपटू

अपघातात मृत्यू झालेली अनुश्री ही उत्कृष्ट बॅडमिंटनपट्टू होती. तिने यापूर्वी अनेक बॅडमिंटनच्या स्पर्धा गाजवल्या होत्या. इतकेच नाहीतर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतही तीने अनेकदा नाव कमावलं होतं. अनुश्री ही अभ्यासातही हुशार होती. इयत्ता नववीमध्ये तिने नुकतेच 95 टक्के पेक्षा अधिक मार्क मिळून ती क्लासमध्ये गुणवत्ता यादीत चमकली होती. ती नुकतीच इयत्ता दहावी मध्ये गेली होती. दापोलीच्या सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूलची ती विद्यार्थिनी होती. अनुश्रीला उत्कृष्ट डान्सही करता येत असे. या भीषण अपघातात माय-लेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनुश्री व तिच्या आई सुवर्णा यांच्या मृत्यू झाल्याची बातमी कळताच दापोली परिसरावर शोककळा पसरली आहे. अनुश्रीच्या मृत्यूची बातमी कळताच मैत्रिणींकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

आई स्टेट बँकेच्या कर्मचारी होत्या

या अपघातात अनुश्रीची आई सुवर्णा मरकड यांचाही मृत्यू झाला आहे. त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी आहेत. त्या वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होत्या. त्यापूर्वी दापोली शाखेत कार्यरत होत्या. अलीकडेच त्यांची खेड तालुक्यातील फुरुस शाखेत बदली झाली होती. मनमिळावू स्वभावाच्या व मदतशील म्हणून त्या परिसरात परिचित होत्या.

दापोलीवर शोककळा

या भीषण अपघातामुळे दापोली परिसरावर शोककळा पसरली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे सहाय्यक कुलसचिव या पदावरती अनिल मरकड हे कार्यरत आहेत. ते सुट्टी संपवून त्यांचे मूळ गाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तिसगाव येथून ते पुन्हा दापोलीत येत होते, त्यावेळी हा भीषण अपघात झाला. महामार्गावर पोलादपूर जवळ उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला मागून कारची धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.

अनुश्रीच्या वडिलांवर उपचार सुरु

या भीषण अपघाताचे वृत्त कळताच दापोली येथील कृषी विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी मरकड यांची दापोली येथील मित्रमंडळी पोलादपूर येथे दाखल झाले आहेत. डॉ. अनिल मरकड हे अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

या अपघाताचे वृत्त कळताच पोलादपूर येथील सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या मंडळींनी घटनास्थळी रुग्णालयात तातडीने धाव घेतली. पोलादपूरचे पोलीस निरीक्ष आनंद रावडे यांनीही घटना यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य केले. परिसरातील अनेक रेस्क्यू टीम ही घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims