साऊथकडील एक अभिनेत्री जुली हिने माजी अभिनेता आणि आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री 'थलपती विजय' यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. 'मारिया जुलियाना' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीचा दावा आहे की, थलपती विजय यांच्या 'TVK' पक्षाचे समर्थक आणि चाहत्यांमुळे तिला आपले बाळ गमवावे लागले.
जुलीचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर लोकांनी तिच्यावर ट्रोलिंगला असा काही निशाणा साधला की, तिला तीव्र मानसिक त्रास सहन करावा लागला; आणि याच कारणामुळे तिचा गर्भपातही झाला.
तमिळ अभिनेत्री जुलीचे मुख्यमंत्री विजयवर गंभीर आरोप
नुकतीच अभिनेत्रीने जुलीने चेन्नई येथे एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये तिने हे दावे केले आणि मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यावर आरोप लावले. जुलीने सांगितले की, तिच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगविरोधात तिने चेन्नईमध्ये पोलिसांकडे तक्रारही नोंदवली आहे. मार्च महिन्यातच तिने या ट्रोलिंगविरोधात पोलिसांशी संपर्क साधून 8 जणांविरोधात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर किडनी घोटाळ्यात नाव
अभिनेत्री जुलीच्या म्हणण्यानुसार,तिला एक आली होती; ज्यामध्ये हे प्रकरण फौजदारी स्वरूपाचे नसून, ते दिवाणी मानहानीच्या कक्षेत येते असे नमूद केलेले. ही नोटीस DMK सरकारकडून TVK सरकारकडे सत्तांतर झाल्यानंतर जारी करण्यात आली होती. या घडामोडीची तिला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. जुलीने असाही आरोप केला की, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, 15 लाख रुपयांच्या किडनी घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला.
जो कोणी TVK विरोधात बोलतात त्या महिलेची प्रतिष्ठा मलिन केली जाते
जुलीने असाही दावा केला की, तिचे नुकतेच लग्न झाले होते आणि त्यानंतर लगेचच तिने आपले पहिले बाळ गमावले. या ट्रोलिंगमुळे जो काही तिला मानसिक तणाव आला त्यामुळेच तिच्या बाळाचा मृत्यू झाला. जुलीने स्पष्ट केले की, या परिस्थितीचा वापर करून ती लोकांची सहानुभूती मिळवू शकली असती; परंतु, तिच्या आणि तिच्या पतीविरोधात पसरवल्या जाणाऱ्या अत्यंत अपमानकारक, खोट्या आरोपांची चिंता तिला सतावत होती. अभिनेत्रीच्या मते जेव्हा जेव्हा एखादी महिला TVK विरोधात आवाज उठवते, तेव्हा कोणत्याही निर्बंधांशिवाय, अत्यंत निर्दयपणे तिची प्रतिष्ठा धुळीस मिळवली जाते.
'माझ्या बाळाच्या मृत्यूला विजय अण्णाच जबाबदार '
ज्युलीने म्हटले की, आठ व्यक्तींविरुद्ध तिने जी पोलिसांत तक्रार दाखल केलीय ती गांभीर्याने घेतली जात नाहीये; कारण ती मंडळीही 'TVK'चे समर्थक आहेत. या पत्रकार परिषदेत ज्युली पुन्हा एकदा रडू लागली आणि म्हणाली, "माझ्या बाळाच्या मृत्यूला विजय अण्णाच जबाबदार आहेत. कदाचित त्यांनी हे कृत्य प्रत्यक्षपणे केले नसेल; पण तरीही, जर त्यांनी केवळ एक शब्द जरी उच्चारला असता, त्या लोकांना फक्त मागे हटण्यास सांगितले असते तर आज जे काही मी गमावले आहे, ते सर्व मला गमावण्याची वेळच आली नसती."
टीव्हीके समर्थक आणि वकिलही सामील असल्याचा ज्युलीचा आरोप
या पत्रकार परिषदेदरम्यान, ज्युलीने अनेक दावे करत विविध आरोप केले. ट्रोलर्सनी तिच्याविरोधात एख कथानक रचले आहे. इतकेच नाही तर, तिच्यामते या आरोपांमागे एक टीव्हीके समर्थक आणि एक वकील आहेत. लोक अनेकदा म्हणतात की विजय "इन्स्टाग्रामद्वारे" मुख्यमंत्री झाले. आपल्या समर्थकांविरुद्ध बोलणाऱ्यांवर हल्ले घडवून आणण्याऐवजी, त्यांनी जनतेसाठी काहीतरी करायला नको का?
मात्र या सर्व प्रकरणावर थलापती विजयच्या चाहत्यांनीही जुलीवर आपला संताप व्यक्त केला आणि, 'आपल्या गर्भपातासाठी ती अभिनेत्यापासून मुख्यमंत्री बनलेल्या नेत्याला का दोष देत आहे?' असा प्रश्न उपस्थित केला.
जुली, उर्फ मारिया जुलियाना, कोण आहे?
जुली ही साऊथ सिनेमा आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात तिने मोहम्मद इक्रिमशी विवाह केला. 2017 मध्ये बिग बॉस तमिळमध्ये सहभागी झाल्यानंतर जुलीला घराघरात लोकप्रियता मिळाली. त्यानंतर, 2022 मध्ये तिने बिग बॉस अल्टिमेटमध्येही सहभाग घेतला. जुलीने अनेक तमिळ चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.

