रहीम शेख, धाराशिव : राज्यभरात अधिक मासचा म्हणजेच धोंड्याचा महिन्याचा उत्साह आहे. धोंड्याच्या महिन्यात जावयाला सासरवाडीकडून विशेष मानपान मिळतो. सासरच्या मंडळींकडून जावयाला भोजनाचं निमंत्रण दिलं जातं.
यासोबतच जावयाचं औक्षण केलं जातं. यावेळी जावयाला सासरच्या मंडळींकडून स्पेशल भेटवस्तू दिली जाते. जावयाला आयुष्यभर लक्षात राहील अशी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न सासऱ्याचा असतो. अर्थात जो तो आपापल्या ऐपतीनुसार भेटवस्तू देत असतो. पण राज्यभरात अधिक मासच्या महिन्यात जावयाचा सन्मान केला जातो. जावयाला धोंडा दिला जातो. हे सर्व सांगण्यामागचं कारण म्हणजे धाराशिवमध्ये एका जावयाला सासरच्या मंडळींकडून मिळालेलं विशेष गिफ्ट.
धाराशिवमध्ये अधिक मासनिमित्त सासऱ्याकडून जावयाला अनोखी भेट देण्यात आली आहे. या भेटीची पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे. महागाई आणि पेट्रोल दरवाढीच्या काळात जावयाला तब्बल सिंधी जातीची घोडी भेट देण्यात आली आहे. पारंपरिक धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात ही आगळीवेगळी भेट देण्यात आल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. "पेट्रोलपेक्षा घोडीच परवडली", अशा प्रतिक्रिया देखील नागरिकांमधून उमटत आहेत. या अनोख्या भेटीमुळे परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे. सासऱ्याकडून मिळालेली ही भेट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
ईट येथील वकील क्रांतीसिंह राऊत यांचा विवाह कोरोनापूर्वी पारा येथील विलासराव झांबरे यांच्या मुलीशी झाला होता. आणि ऐन कोरोना काळात अधिक मास आला होता. या काळात सासऱ्याने जावयाची हौस केली नव्हती. कारण होते कोरोनाचा संकट काळ.
सध्या अधिक मास सुरू आहे. या महिन्यामध्ये जावयाला सासरी बोलावून पाहुणचार केला जातो आणि नंतर सोने स्वरूपात किंवा इतर वस्तू स्वरूपात त्यांना भेट दिली जाते. क्रांतिसिंह राऊत यांना देखील पारा येथील सासरवाडीत अधिकमासाचे जेवणाचे निमंत्रण दिले होते. सासरे विलासराव झांबरे यांना माहिती होते की जावई क्रांतीसिंह यांना घोडा आवडतो. नेमका हाच धागा पकडून सासरे विलासराव झांबरे यांनी केज तालुक्यातील साळेगाव येथील सलमान खान यांच्या माध्यमातून सिंधी जातीची घोडी आणली.
जावई क्रांतीसिंह राऊत यांना धोंडे जेवण खाऊ घातल्यानंतर ही सिंधी जातीची घोडी त्यांना भेट स्वरूपात देण्यात आली. या घोडीची किंमत काहीही असली तरी हौसेला मोल नसते, सासऱ्याने जावयाची हौस पूर्ण केली आहे. जावई क्रांतीसिंह राऊत या घोडीवर बसून शेतात जातात. त्यांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेती असल्या कारणामुळे या घोडीचा उपयोग आता त्यांना शेतात जाण्यासाठी होतो.
वाढलेले पेट्रोल, डिझेल, गॅस याचे दर गगनाला भिडले आहेत. पण घोडीला पेट्रोल, डिझेल, गॅस लागत नसल्यामुळे वकील क्रांतिसिंह राऊत यांना याचा खर्च सध्यातरी बसत नाही. घोडीला लागतो तो केवळ चारा. क्रांतिसिंह राऊत यांच्या या घोडीची चर्चा धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे.

