प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा येते. एकदा कृष्ण पक्षात आणि एकदा शुक्ल पक्षात. अधिकमासातील पहिला व मे महिन्याचा शेवटचा प्रदोष व्रत ज्येष्ठ शुक्ल तिथीला असणार आहे. प्रदोषव्रत हे भगवान शिवांना समर्पित मानले जाते.
त्यामुळे या दिवशी विधी-विधानाने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक आणि त्यांची पूजा करणे लाभदायक मानले जाते. तसेच यंदाचा प्रदोष गुरूवारी असल्यामुळे याला गुरु प्रदोष असेही म्हणतात. याशिवाय अधिकमासातील प्रदोष असून तो भगवान विष्णूंच्या वारी म्हणजेच गुरुवारी आल्याने दुप्पट शुभ संयोग निर्माण झाला आहे. यादिवशी महादेव आणि विष्णू दोघांची मनोभावे पूजा करावी. चला पाहुयात गुरु प्रदोषची नेमकी तारीख कोणती?
अधिकमासातील पहिला प्रदोष व्रत कधी आहे?
पंचांगानुसार, ज्येष्ठ शुक्ल पक्ष 28 मे, गुरूवारी, सकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी सुरूहोईल आणि 29 मे रोजी सकाळी 9 वाजून 51 मिनिटांनी संपेल. त्यामुळे प्रदोषकाळानुसार हे व्रत 28 मे गुरुवार रोजीच ठेवले जाईल. गुरूवारी प्रदोष असल्यामुळे याला गुरू प्रदोष व्रत म्हणतात. त्यामुळे, या दिवशी महादेवाची पूजा करण्यासोबतच भगवान विष्णूजींची पूजा करणंही लाभदायक मानले जाईल.
गुरू प्रदोषव्रत पूजेचा शुभ मुहूर्त
हिंदू धर्मात प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे. प्रदोष व्रताची पूजा ही सायंकाळी प्रदोषकाळात केली जाते. यंदा प्रदोषव्रत 28 मे, गुरूवारी असून पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 6:12 वाजल्यापासून 7:57 वाजेपर्यंत असेल. त्यावेळी सूर्योदयाची वेळ 7:12 वाजता असेल. प्रदोषकाळात या शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते.
गुरू प्रदोष व्रताची पूजा विधी
सर्वप्रथम सकाळी लवकर उठल्यावर स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र धारण करावेत. नंतदेवासमोर बसून व्रताचा संकल्प घ्यावा. आपले देवघर स्वच्छ करावे आणि चौरंगावर लाल किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरावे त्यावरमहादेवाची मूर्ती किंवा प्रतिमा अथवा शिवलिंगाची स्थापना करावी. पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे. त्यानंतर फुले,हार,बेलपत्र वाहून महादेवाला भस्म किंवा चंदन लावून मग धूप दीप अगरबत्ती लावावी. चुर्म्याचा प्रसाद दाखवावा. प्रदोषव्रताची कथा वाचावी. महादेवाच्या मंत्राचा जप करून मग सर्वात शेवटी आरती करावी. त्यानंतर घरात सर्वांना प्रसाद देऊन मग उपवास सोडावा.

