Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अल्फा

माणसाच्या आयुष्यात प्रामुख्यानं दोन टप्पे येतात. पहिला म्हणजे आपण आयुष्यात काहीतरी चांगलं केलंय, आयुष्यात काहीतरी चांगलं घडलंय, म्हणून आपण समाधानी असतो. दुसरा टप्पा म्हणजे आपल्या हातून काहीतरी अक्षम्य चूक घडून गेलेली असते, अथवा आपल्यासोबत खूप काही वाईट घडलेलं असतं.

त्याला धरून आपण स्वतःलाच कोसत असतो. 'अल्फा' बघणं म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये जाणं झालं.

लहानपणी मुलं-मुली एकत्र येऊन खेळभांडीसारखा खेळ खेळायचे, तसाच हा लुटूपुटूचा खेळ आहे. बरेच दिवस मार्केटमध्ये नाही आलो तर करून टाकू एखादा चित्रपट. प्रेक्षक काय, आपलेच आहेत; धरा त्यांना गृहीत, असा हा मामला आहे. मात्र, भारतीय सैन्यदल, गुप्तचर यंत्रणांना केंद्रस्थानी ठेवून जो काही उच्छाद मांडला गेलाय, तो डोकं भणभणून सोडणारा आहे. देश ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून थट्टा उडवण्याचा, प्रेक्षकांची मोठी परीक्षा बघण्याचा प्रकार आहे.
कथा म्हणाल तर फारसं नावीन्य काही नाही. फक्त या कथेला एक मुलामा चढवून ताणाताणी तेवढी आहे. याआधी कुणी केलं म्हणून आपणही एखादा स्पाय चित्रपट काढूनच टाकू, बॅनरच्या नावावर तो चालेलच, असा मोठा गैरसमज निर्मात्यांचा झालेला असू शकतो. मात्र, उत्तम दर्जाची स्पाय कलाकृती अगदी अलीकडेच अनुभवल्यानंतर लगोलग झालेला बाष्कळ प्रयत्न रसिकांच्या पचनी पडणार कसा? हे तर म्हणजे सुग्रास भोजन पोटभरून जेवल्यानंतर, ते पचायच्याही आधी कारल्याची कडू भाजी खायला दिल्यासारखं झालं.

तर, 'अल्फा'ची कथा सुरू होते १९९९च्या कारगिल युद्धानंतर. आपले सैनिक शहीद झालेत म्हणून सैन्यदलाचे बडे अधिकारी कर्नल विक्रांत कौल (अनिल कपूर) व्यथित आहेत. अशा वेळी दुसरा अधिकारी फतेहसिंग लखावत (बॉबी देओल) एक नवा शोध लावतो. तो म्हणजे, आपल्या सैन्य दलाला अल्फा नावाच्या सीरमची लस द्यायची; यामुळे आपले जवान अधिक कार्यक्षम व मजबूत होतील. त्यांच्या भरवशावर आपण पुढची युद्धं सहज जिंकू शकू, असा विश्वास फतेहला आहे. विक्रांतही त्याला साथ देतात. त्याचदरम्यान, विक्रांत यांची गर्भवती पत्नी जानकी (दिया मिर्झा) मरणाच्या दारात उभी असते. भावनाविवश विक्रम ती लस जानकीला देतात. मात्र, प्रसूतीवेळी जानकीचा मृत्यू होतो. प्रसूतीतून जन्मलेली मुलगी ही देशाची संपत्ती आहे, कारण तिच्या शरीरात आता अल्फा सीरम आहे, असं म्हणून फतेह तिला घेऊन जातो. विक्रांत विरोध करतात. मात्र, फतेह त्यांना दुसऱ्याच एका मृत मुलीचं पार्थिव देत त्यांची दिशाभूल करतो. आपली मुलगी मृत झाली, असा समज त्या पित्याचा होतो. इकडे फतेह त्या मुलीचं नामकरण सीता (आलिया भट) असं करून तिला कठीण प्रशिक्षण देतो. सीता मोठी होत जाते. मात्र, तिच्याच पाठी दुसऱ्या मुलीचा-दुर्गाचाही (शर्वरी वाघ) जन्म झालेला असतो, ही बाब फतेहला माहिती नसते. विक्रांत दुर्गाला स्पेनमध्ये नातेवाइकांकडे पाठवून देतात. इकडे सीता कठाेर तालमीत तयार झालेली आहे. फतेह तिला शत्रूंना संपविण्याची एकेक कामगिरी देतो. मात्र, देशाचा खरा शत्रू फतेहच आहे, हे कळल्यावर सीताच्या आयुष्याचं ध्येय बदलतं. बालपणापासूनच कुटुंबापासून दूर झालेली भावनाशून्य सीता बहीण दुर्गा व वडिलांच्या भेटीनंतर बदलत जाते. पुढं काय काय वाढून ठेवलंय, ते या चित्रपटात आहे.

गंभीर विषय हाताळताना तरी पूर्वापार चालत आलेला ठोकताळा थोडा दूर ठेवायचा, हे काही निर्मात्यांनी अजिबात मनावरच घेतलेलं नाही. एखाद्या कथेवर मेहनत घेताना संशोधन तर दूर राहिलं. मात्र, त्या विषयाचा पचका कसा करायचा, याचा 'अल्फा' हा परिपाठ आहे. दोनपैकी एखाद्या हिरॉइनची एंट्री दाखवायची तर ती तोकड्या कपड्यांत, नैन मटक्के करीत, वाकडेतिकडे डान्स करूनच दाखवली पाहिजे, हा गैरसमज आताच्या काळात दूर झाला पाहिजे. कारण आता प्रगल्भ झालेला प्रेक्षक या सर्वांच्या पुढं गेलेला आहे.

चित्रपटाची सुरुवात सोडली तर नंतर सगळं अतर्क्य प्रकरण आहे. उच्च यंत्रणेला अंधारात ठेवून फतेह मिशन अल्फा राबवतो, हे म्हणजे अतीच झालं. सीताची एंट्री म्हणाल तर ब्रूम-ब्रूम बाइकवर इकडे-तिकडे झिगझॅग उडत झालेली. हातात फ्रेंच फ्राइजचा पुडा. आल्या-आल्या दहा-वीस जणांना ढिशूम-ढिशूम करत ती अशी यूँ लोळवते, जसं अंगावर पडलेले किडे झटकावेत. तेही स्टाइल मारत-मारत. आता वास्तववादी चित्रपटांचा जमाना असताना कुणाला हा स्टाइल मारण्याचा मोह आवरतच नसेल, तर बापडे प्रेक्षक काय करणार? बहुतेकदा कलावंत आपल्या वाट्याला आलेल्या पात्रात शिरतात. इथं वेगळं आहे. इथं पात्र आलिया भटमध्ये शिरलंय. सीतापेक्षा मी आलिया कशी आहे, हे दर्शवण्यातच तिचा बराच वेळ गेलाय. तिनं समोरच्यांना बुक्क्या मारल्या तरी गुदगुल्याच होतील, असं तिचं कोमल पोश्चर पाहून जाणवत राहतं. शर्वरीनं बऱ्यापैकी बरं करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर विषयाच्या तुलनेत तिला ग्लॅमरस डॉल म्हणून दाखवण्याचा प्रयत्न अधिक झाला. आपल्याकडे शुद्ध भाषेत याला 'येलपाडेपणा' असं म्हणतात.

आणखी खास मजा तर कबीरच्या भूमिकेतील हृतिक रोशनच्या एंट्रीला आहे. सध्या साधू बनलेला मात्र कधीकाळी खतरनाक एजंट असलेल्या कबीरच्या मठात शत्रू घुसतात. धडाधड गोळ्या झाडतात. समोरच बसलेल्या कबीरला एकही गोळी लागत नाही. उलट तो हातांनी त्या अडवतो. माय गॉड! असो...
तर असे बरेचसे चमत्कार तुम्हाला 'अल्फा'मध्ये दिसतील. काही ॲक्शन सीन, छायाचित्रण, लोकेशन या बाबी सोडल्या तर बाकी डोक्याला ताप आहे. कथा पुढं नेण्याची ही लुटूपुटूची ढकलगाडी आहे. या गाडीत बसलातच तर पुढचे दोन दिवस तुमची चिडचीड पक्की आहे.

सिनेमा : अल्फा
-दिग्दर्शक : शिव रवैल
-निर्माते : यशराज फिल्म्स
-कलाकार : अनिल कपूर, बॉबी देओल, आलिया भट, शर्वरी वाघ आदी.
-दर्जा : दोन स्टार्स/पाचपैकी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims