Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Aslam Shaikh : पैशांनी आमचा माणूस परत येणार का? मॅनहोल दुर्घटनेतील अस्लम शेखच्या कुटुंबाचा उद्रेक, पित्याचा फोटो दाखवत संतप्त सवाल

Aslam Shaikh : पैशांनी आमचा माणूस परत येणार का? मॅनहोल दुर्घटनेतील अस्लम शेखच्या कुटुंबाचा उद्रेक, पित्याचा फोटो दाखवत संतप्त सवाल

मुंबई : शालेय बसवर झाड पडून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची चेंबूर येथील घटना ताजी असतानाच कुर्ला साकीनाका येथे खैरानी मार्ग परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.

अस्लम शेख (५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कितीही पैसे दिलेत तरी आमचा माणूस परत येणार आहे का, अशा शब्दात शेख यांच्या कुटुंबीयांनी उद्रेक व्यक्त केला.

मोबाईलवर बोलताना पडले

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. महापालिकेच्या एल वॉर्डमधील कुर्ला साकीनाका खैरानी मार्ग परिसरात मलनिःसारण प्रचालन विभागाच्या अंतर्गत एका मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी सकाळी ११ वाजताच्या सुमारास रस्त्यावरुन अस्लम शेख मोबाइलवर बोलत जात होते.

बचावाचे प्रयत्न फोल

ते मॅनहोलजवळ आले असता तेथे काम करत असलेल्या एका व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेख यांचा तोल जाऊन ते मॅनहोलमध्ये पडले. घटनेची माहिती मिळताच महापालिका अधिकारी, अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शेख यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर शेख यांना घटनास्थळाच्या पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेख यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे.

लेकीला अश्रू अनावर

अस्लम शेख यांची मुलगी शबनमला आपल्या भावना आवरणे कठीण झाले. कामासाठी घराबाहेर पडलेले वडील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरण पावले आहेत, हे समजताच तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. तिचे लहान मूल तिच्या शेजारीच चटईवर झोपले होते.

धाकट्या भावाला फोन

अस्लम शेख यांचा भाऊ अकबरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, कामावर असतानाच त्याला फोन आला की त्याचा भाऊ मॅनहोलमध्ये पडला आहे. "आम्ही चार भाऊ आहोत आणि अस्लम सर्वात मोठा होता. तो विविध कामांच्या ठिकाणी डंपरमध्ये माती भरण्याचे काम करायचा. हे काम त्याला रोजंदारीवर मिळायचे आणि त्यातून तो दिवसाला साधारण ४०० ते ५०० रुपये कमवायचा. गुरुवारी सकाळी त्याला काम मिळाले नाही, त्यामुळे नेहमीप्रमाणे जिथे तो थांबायचा, त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर काही वेळ वाट पाहिल्यानंतर तो घरी निघाला होता." असे अकबरने सांगितले.

पैशांनी माणूस परत येणार नाही

अस्लम शेख यांची पत्नी एका सुपरमार्केटमध्ये काम करते आणि त्यांचा २५ वर्षांचा मुलगा अली याला नुकतीच एका कार्यालयात लिपिकाची नोकरी मिळाली होती. मुंबईच्या महापौर रितू तावडे या कुटुंबाची भेट घेण्यासाठी रुग्णालयात आल्या, तेव्हा अस्लम यांच्या वहिनी, शाइस्ता यांनी त्यांना प्रश्न विचारला "शहरातील गरिबांच्याच वाट्यालाच मॅनहोलमधील मृत्यू का येतात?" शाइस्ता म्हणाल्या की, पावसाळ्यात अशा घटना घडल्याचे त्या दरवर्षी ऐकत असत, पण आपल्याच कुटुंबावर अशी वेळ येईल असा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. "कितीही पैसे दिले तरी ते परत येणार नाहीत," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

एल वॉर्डमधील (कुर्ला, साकीनाका,चांदिवली) ७५ मॅनहोलवर सरंक्षक जाळ्या बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून अवघे चारच मॅनहोल जाळ्या बसवण्याचे काम शिल्लक आहे. त्यात घटना घडलेल्या मॅनहोलचाही समावेश असल्याचे समजते.

यापूर्वीच्या घटना

ऑगस्ट, २०१७ : एल्फिन्स्टन रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूकर यांचा मृत्यू
२०२४ : अंधेरीच्या सीप्झ परिसरात विमल गायकवाड यांचा उघड्या पर्जन्य जलवाहिनीत पडून मृत्यू

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims