Dailyhunt
Assembly Election Results 2026: मतपरीक्षेचा आज निकाल! पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी; पश्चिम बंगालबाबत उत्कंठा

Assembly Election Results 2026: मतपरीक्षेचा आज निकाल! पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी; पश्चिम बंगालबाबत उत्कंठा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : मतदारांनी मतदानासाठी विक्रमी उत्साह दाखवल्यानंतर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम ही राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील मतपरीक्षेचा निकाल आज, सोमवारी लागणार आहे.

सकाळी ८ वाजल्यापासून या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आपले वर्चस्व टिकवते की, भाजप प्रथमच सत्ता काबीज करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात ७७ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. २९४पैकी २९३ जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या २३४ मतदारसंघांसाठी ६२ मतमोजणी केंद्रांवर सर्व व्यवस्था पूर्ण झाली असून तीनस्तरीय सुरक्षा योजना सज्ज करण्यात आली आहे. द्रमुक, अण्णाद्रमुक आणि विजय यांच्या पक्षाच्या सहभागामुळे निकालाकडे विशेष लक्ष आहे.

सुमारे १.२५ लाख कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ, विरोधी यूडीएफ आणि भाजपप्रणित एनडीए यांच्यातील तिरंगी लढतीनंतर, सर्व १४० जागांसाठी मतमोजणी होणार आहे. राज्यात ४३ ठिकाणी मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. आसाममधील १२६ विधानसभा मतदारसंघांतील ४० मतमोजणी केंद्रांवर सोमवारी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी होणार आहे. पुद्दुचेरी विधानसभेच्या ३० जागांच्या निवडणुकीची मतमोजणी पुद्दुचेरी, कारैकल, माहे आणि यानम या चार प्रदेशांमध्ये होणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाजप नेते कुंदन सिंह यांच्या घराबाहेर गोळीबार झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.

बारामती, राहुरीकडे लक्ष

बारामती : बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही आज, सोमवारी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या एमआयडीसी बारामती येथील गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. राहुरीच्या मतमोजणीत २७ फेऱ्या होणार आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत पहिला कल आणि दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचा अंदाज आहे.

भवानीपूरमध्ये पुन्हा तणाव
कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघातील मतमोजणी केंद्राबाहेर रविवारी पुन्हा गोंधळ उडाला. भाजपचा झेंडा असलेल्या दोन वाहनांना ईव्हीएम परिसरात प्रवेश दिल्याचा आरोप तृणमूल कार्यकत्यांनी केला. तपासणीत काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने गाडी जाऊ देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

'गोंधळ घालण्याचा भाजपचा कट
चेन्नई: 'भारतीय जनता पक्ष ४ मे रोजी मतमोजणी केंद्रांवर, संवेदनशील ठिकाणी; तसेच पक्ष कार्यालयांजवळ गोंधळ निर्माण करण्याचा योजत आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात,' अशी मागणी करणारे पत्र तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने तमिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना रविवारी दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims