शिमला: हिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध अटल बोगद्याच्या बाहेर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. रात्री नऊच्या दरम्यान एक स्कॉर्पिओ कार बोगद्यातून भरधाव वेगात बाहेर आली. कारचा वेग जास्त असल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं.
कारचा वेग इतका जास्त होता की ती रस्त्याशेजारी असलेले बॅरिकेड्स तोडून थेट एका निर्माणाधीन पिलरच्या ढाच्याला जाऊन धडकली. पिलरचं काम सुरू होतं. स्कॉर्पियो कार पिलरच्या लोखंडी सळयांमध्ये जाऊन अडकली.
स्कॉर्पियो कारचा अपघात अतिशय भीषण होता. सिमेंटच्या खांबाच्या टोकदार सळया कारमधून आरपार गेल्या. या अपघातात कारच्या पुढील भागाचं प्रचंड नुकसान झालं. कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तो राजस्थानचा रहिवासी आहे. या अपघातात त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. ते उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.
स्कॉर्पिओमधून प्रवास करणारे तरुण पर्यटनासाठी गेले होते. मनालीला फिरुन ते लाहोलच्या दिशेनं जात होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठा आवाज झाला. एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं.
स्कॉर्पिओ कार पिलर आणि सळयांच्या मध्ये अतिशय विचित्रपणे अडकली होती. त्यामुळे जखमींना बाहेर काढणं अतिशय अवघड होतं. मदत आणि बचाव पथकानं बरेच प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली आणि जखमींना बाहेर काढलं. सगळ्या जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी मृताचं शव ताब्यात घेऊन उत्तरीय चाचणीसाठी पाठवलं आहे.
स्कॉर्पिओचा भरधाव वेग आणि कारवरील नियंत्रण अचानक सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. अपघातामागील अन्य कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. अपघात झाल्यानंतर तिथे लोकांची मोठी गर्दी जमली. अपघाताचे फोटो, व्हिडीओ समोर आले. त्यात सिमेंटच्या खांबाच्या सळया आणि त्या सळ्यांमध्ये विचित्रपणे अडकलेली कार अगदी स्पष्ट दिसत आहे. या फोटोंमधून अपघाताची तीव्रता दिसून येत आहे.

