Dailyhunt
'बॅग तोडली ८ हजारांची नुकसान भरपाई ४५००', विमान प्रवासी संतापला, फोटो व्हायरल होताच IndiGo ट्रोल

'बॅग तोडली ८ हजारांची नुकसान भरपाई ४५००', विमान प्रवासी संतापला, फोटो व्हायरल होताच IndiGo ट्रोल

IndiGo Faces Criticism Over 4500 Offer for Damaged Luggage: इंडिगो फ्लाइटमध्ये एका प्रवाशाच्या बॅगेचं नुकसान झालं. ही बॅग ८ हजारांची होती पण कंपनी फक्त अर्धी किंमत देत आहे. त्यामुळे प्रवासी नाराज असून कंपनीवर टीका करत आहे.

या घटनेमुळे ग्राहक हक्क, सामानाचे नियम आणि एअरलाईन्स सेवांवर चर्चा सुरू झाली आहे.

विमान प्रवास हा बस किंवा ट्रेनच्या तुलनेत महागडा असतो, त्यामुळे अर्थातच एअरलाईन्सने चांगल्या सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा बहुतांश प्रवासी करतात. चांगल्या सुविधा म्हणजे काय तर विमान वेळेवर उड्डाण घ्यावं, सामान सुरक्षित राहावं, आणि विमानातील अन्न-पदार्थांचे दर थोडे कमी असावेत अशा सर्व सामान्य अपेक्षा प्रवाशांच्या असतात. पण अनेकदा एअरलाईन्स प्रवाशांना निराश करतात.

असाच काहीसा अनुभव एका प्रवाशाने सांगितला. इंडिगो फ्लाइटमध्ये त्याच्या बॅगेला तडे गेले. लक्षवेधी बाब म्हणजे या बॅगेची किंमत तब्बल ८ हजार रुपये असल्याचं तो म्हणतोय, पण कंपनीने त्याला केवळ ४,५०० रुपयांची नुकसानभरपाई देऊ असं म्हटलं आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.८ हजारांची बॅग, ४.५ हजारांची भरपाई​



ही पोस्ट @sonasingh46 या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. आशुतोष नावाच्या व्यक्तीनं आरोप केलाय की इंडिगो फ्लाईटमधून प्रवास करताना त्याच्या बहिणीच्या बॅगेचं मोठं नुकसान झालं. या ऑलिव्ह-ग्रीन हार्ड-शेल मोकोबारा बॅगेचा फोटो देखील त्यानं या पोस्टमध्ये शेअर केला आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता बॅगेच्या कडेला तडे गेल्याचं दिसत आहे. आशुतोष म्हणतोय, या बॅगची किंमत सुमारे ८ हजार रुपये इतकी आहे. पण एअरलाईन्सनं त्यांना केवळ ५४०० रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचं आश्वासन दिलं आहे. हे पैसे बॅगेच्या मूळ किंमतीपेक्षा फारच कमी आहेत. पुढे त्यानं सवाल केले की हा कसला नियम आहे? ग्राहक सुरक्षा हा निव्वळ विनोद आहे का? DGCA India या प्रकरणाकडे लक्ष देणार आहे का?

ही पोस्ट आतापर्यंत ३ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय, ही नुकसान भरपाई खूप जास्त आहे. कारण त्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासात नुकसान झाल्यानंतरही फक्त १५ डॉलर्स मिळाले होते. तर काहींनी स्वत:चे अनुभव सांगत कंपनीला काहीच फरक पडत नाही असं सांगीतलं.

नियम काय सांगतात?​



असो, पण आता हे प्रकरणात पुढे काय घडेल हे तर काळच ठरवेल आणि पुढे काही दिवसांत त्याबद्दल माहिती समोर येईलच. पण विमान प्रवासातले सामानाबाबतचे
नियम काय सांगतात? ते जाणून घेऊया.

चेक-इन केल्यानंतर एअरलाईनची जबाबदारी मर्यादित असते. त्यामुळे जास्त संरक्षण हवं असेल तर प्रवाशांनी प्रवास विमा घ्यावा. नुकसानभरपाई ठराविक नियमांनुसार दिली जाते आणि पूर्ण किंमत मिळत नाही. त्याऐवजी डिप्रीशिएशन अर्थात सध्याची किंमत धरली जाते, कारण बॅग नवी असल्याचं गृहित धरलं जात नाही. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये प्रवासी अनेकदा एअरलाईन्सवर टीका करताना दिसतात.

हे नियम अगदी थोडक्यात सांगीतले आहेत. याबद्दल जर तुम्हाला आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. तिथे तुम्ही विमान प्रवासाबाबत आणखी महत्वाची माहिती मिळवू शकता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims