Dailyhunt
Baramati By-Election Result : 15 फेऱ्या बाकी, तरी 77 हजारांची लीड; सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय निश्चित; तरी म्हणाल्या, गुलाल उधळू नका, कारण...

Baramati By-Election Result : 15 फेऱ्या बाकी, तरी 77 हजारांची लीड; सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय निश्चित; तरी म्हणाल्या, गुलाल उधळू नका, कारण...

बारामती : उपमुख्यमंत्रिपदावर असताना अजित पवार यांचे पुण्यात विमान अपघातात निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. अजित दादांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच त्यांनी विजय निश्चित केला.

मात्र इतका मोठा विजय मिळवूनही कुठलाही जल्लोष न करण्याचं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. एक्स सोशल मीडियावरुन सुनेत्रा पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करुया, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं.


दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची! असं ट्वीट सुनेत्रा पवार यांनी केलं आहे.

सुनेत्रा पवार यांना किती मतं?

पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच सुनेत्रा पवार यांनी विजयी आघाडी घेतली. नवव्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांना 78 हजार 528 मतं मिळाली आहेत. इतरांना मिळालेली एकूण मतं 1 हजार 425 इतकी आहेत. सुनेत्रा पवारांना नवव्या फेरीतच 77 हजारांची लीड मिळाली आहे.


नवव्या फेरीत
एकूण झालेले मतदान - 8022
सुनेत्रा पवार - 7886
इतर मते - 136

पारंपरिक राजकीय गड

बारामतीच्या पोटनिवडणुकीला भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही बाजूंनी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, तसेच बारामतीतील पारंपरिक राजकीय वर्चस्व या पार्श्वभूमीवर बारामतीतील पोटनिवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. बारामतीत राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली, तेव्हापासून सुनेत्रा पवार यांची आघाडी कायम आहे. मतमोजणीसाठी ३०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims