Dailyhunt
बायको, प्रेयसीला भूखंड गिफ्ट; मोलकरीण थारनं घरकामाला यायची; DSP ची काळी माया, आता ED च्या रडारवर

बायको, प्रेयसीला भूखंड गिफ्ट; मोलकरीण थारनं घरकामाला यायची; DSP ची काळी माया, आता ED च्या रडारवर

डीएसपी राहिलेला अधिकारी आता ईडीच्या रडारवर आहे. त्यानं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमा केली. आता त्याच्या काळ्या पैशांचा शोध घेतला जात आहे. त्याच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याचा कारनामा

डीएसपी राहिलेल्या अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. गौतम अधिकारी यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवली. त्याची मोजदाद आर्थिक गुन्हे शाखा आणि सक्तवसुली संचलनालयाकडून सुरु आहे. यातून आतापर्यंत ८० कोटींची संपत्ती समोर आली आहे.


भ्रष्ट मार्गानं कोट्यवधींची कमाई

बिहारच्या किशनगंजचे डीएसपी राहिलेल्या गौतम कुमार यांनी भ्रष्ट मार्गानं कोट्यवधींची माया गोळा केली. बिहारमधील लोकांची वार्षिक कमाई साधारणत: ७६ हजार ते ७७ हजारांच्या घरात आहे. बिहारचे सव्वा लाख लोक मिळून महिन्याला जितके कमावतात, तितकी कमाई गौतम कुमार यांनी केली आहे.


अनेक राज्यांसह नेपाळमध्येही मालमत्ता

गौतम कुमार यांची पत्नी, प्रेयसी आणि मोलकरणीच्या नावे बेनामी संपत्ती आढळून आली आहे. त्यांच्या काळ्या कमाईचे धागेदोरे बिहारपासून सिक्कीम, बंगालपर्यंत पोहोचले आहेत. अगदी नेपाळमध्येही त्यांची गुंतवणूक सापडली आहे.


अनेक ठिकाणी भूखंड खरेदी

२००७ मध्ये गौतम कुमार पोलीस ठाण्याचे प्रभारी होते. तेव्हा त्यांनी जवळपास २५ एकर शेत जमीन खरेदी केली होती. यातील निम्म्या जमिनीची कागदपत्रं आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत.


मोक्याच्या ठिकाणी जागा, चहाचे मळे नावावर

गौतम कुमार यांनी काळ्या पैशातून गंगटोकमध्ये एक आलिशान हॉटेल उभारलं. सिलिगुडीच्या मिरीक परिसरात चहाची बाग आणि बंगला खरेदी केला. नेपाळमध्ये मोठी गुंतवणूक केली. सोबतच फारबिसगंजमध्ये मोक्याच्या ठिकाणी जागा खरेदी केली.


बेनामी संपत्तींचा शोध सुरु

डीएसपी राहिलेल्या गौतम कुमार यांनी त्यांच्या प्रेयसी, मोलकरणीच्या नावे भूखंड खरेदी केले. पारो नावाची महिला त्यांच्याकडे मोलकरीण म्हणून काम करते. ती मूळची पश्चिम बंगालची आहे. पारो थार कार घेऊन गौतम कुमार यांच्याकडे घरकामाला यायची. पारोदेखील कोट्यधीश असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.


ईडीनं फास आवळला

गौतम कुमार यांनी त्यांच्या प्रेयसीच्या नावे अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात ईडीनं फास आवळला आहे. गौतम कुमार यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.


निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे

भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनंतर पोलीस मुख्यालयानं गौतम कुमार यांनी फिल्डवरुन हटवलं आहे. त्यांना मुख्यालयात बोलावण्यात आलं आहे. पोलीस मुख्यालयानं त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims