Dailyhunt
Beed Crime : घरात घुसला, आत्याला ढकललं; मामेभावाने अल्पवयीन बहिणीला घरातून पळवलं,  बीडमध्ये खळबळ

Beed Crime : घरात घुसला, आत्याला ढकललं; मामेभावाने अल्पवयीन बहिणीला घरातून पळवलं, बीडमध्ये खळबळ

सुनील जाधव, बीड: रक्ताच्या नात्यात असलेल्या विश्वासाला तडा देणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना गेवराई तालुक्यातील एका गावातून समोर आली आहे. आपल्याच सख्ख्या आत्याच्या घरी जाऊन, तिच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नात्यांमधील मर्यादा ओलांडणाऱ्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुलगी ही अवघ्या १५ वर्षे १० महिने वयाची असून ती अल्पवयीन आहे. आरोपी हा तिचा सख्खा मामाचा मुलगा आहे. सर्वत्र शांतता होती, तेव्हा आरोपी दुचाकीवरून आपल्या आत्याच्या घरी पोहोचला. घरात प्रवेश करताच त्याने आत्याला (मेहुणी) कोठे आहे? विचारणा केली. आत्याला त्याच्या मनात असलेला कुटील डाव ठाऊक नव्हता. मात्र, आरोपीने काहीही विचार न करता थेट घरात प्रवेश केला आणि पीडित मुलीचा हात धरून तिला बळजबरीने घराबाहेर ओढू लागला.

आईला धक्काबुक्की

आपल्या पोटच्या मुलीला कुणीतरी ओढत नेत असल्याचे पाहून हतबल झालेल्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या भाच्याला रोखण्याचा आणि मुलीला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, नात्याचा कोणताही मान न राखता, मुजोर भाच्याने आत्याला जोरात धक्का देऊन खाली पाडले. आत्याला जखमी अवस्थेत सोडून त्याने त्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिथून वेगाने पोबारा केला.

पोलीस तपास आणि गुन्हा दाखल

मुलीच्या कुटुंबीयांनी आरडाओरडा करत आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन पसार झाला होता. सर्वत्र शोध घेऊनही मुलगी आणि आरोपी मिळून न आल्याने, अखेर पीडितेच्या आईने चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेतली ज्या भाच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच काळजाच्या तुकड्याला पळवून नेले, अशा भावना व्यक्त करत पीडितेच्या आईने तक्रार दिली.

या तक्रारीवरून चकलांबा पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा (IPC कलम ३६३ व अन्य कलमान्वये) गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims