Dailyhunt
Bhandara ST Depo Accident : काळजाचा तुकडा सोबत नेला अन् घात झाला; एसटी डेपोत बस रिव्हर्स घेताना अपघात, तीन वर्षीय चिमुकल्यासह पित्याचा करुण अंत

Bhandara ST Depo Accident : काळजाचा तुकडा सोबत नेला अन् घात झाला; एसटी डेपोत बस रिव्हर्स घेताना अपघात, तीन वर्षीय चिमुकल्यासह पित्याचा करुण अंत

प्रतीक तांबोळी, भंडारा : रिव्हर्स घेत असलेल्या एसटी बसने दुचाकीस्वार बाप-लेकाला चिरडल्याची धक्कादायक घटना भंडारा येथील एसटी डेपोत घडली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

रोहित खेडकर (३०) आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा रौनक खेडकर अशी मृतांची नावे आहेत. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली, ज्यानंतर संतप्त नागरिकांनी डेपोमध्ये गर्दी केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

पाण्याच्या कॅन आणण्यासाठी गेले अन काळ आला...

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक रोहित खेडकर हे भंडारा शहरातील चांदणी चौक, कुंभार टोली येथील रहिवासी असून त्यांचा 'आरो प्लांट'चा व्यवसाय होता. ते शहरासह एसटी डेपोतही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत असत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी रोहित रिकामी झालेली पाण्याची कॅन आणण्यासाठी डेपोत गेले होते. यावेळी त्यांनी कधी नव्हे ते आपला ३ वर्षांचा मुलगा रौनक यालाही सोबत नेले होते.

चालकाचा अंदाज चुकला आणि अनर्थ घडला

बस दुरुस्तीच्या शेडमध्ये उभी असलेली एसटी बस (क्रमांक: एमएच ४०, वाय ५८७६) रिव्हर्स घेत असताना रोहित आपल्या दुचाकीसह त्या बसच्या मागे उभे होते. मात्र, बस चालकाला याचा अंदाज न आल्याने त्याने अचानक बस मागे घेतली. बसने दुचाकीला धडक देऊन काही अंतर फरफटत नेले. हा प्रकार लक्षात येताच अन्य कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत काळाने झडप घातली होती. या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच प्राण गेला.

डेपो परिसरात तणाव आणि नागरिकांचा संताप

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शहरातील शेकडो नागरिक एसटी डेपो परिसरात जमा झाले. या अपघाताला एसटी विभागाचे कर्मचारी आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान, खासदार प्रशांत पडोळे यांनी सहकाऱ्यांसह डेपोत धाव घेत मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि लेखी आश्वासन

घटनेमुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पाहता साकोली, कारधा, भंडारा, जवाहरनगर, जिल्हा वाहतूक शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक घटनास्थळी दाखल झाले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर पहाटे ४ वाजेच्या सुमारास प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी माधुरी तीखे, MSRTC चे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने, अप्पर पोलीस अधीक्षक मोरे, शहर पोलीस निरीक्षक भुसारी, ग्रामीण पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर उपस्थित होते.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims