म. टा. वृत्तसेवा, कल्याण : वयाच्या ९१व्या वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगलेल्या वच्छला लिखार यांनी मृत्यूनंतर देहदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. औपचारिक शिक्षण नसतानाही आयुष्याच्या अनुभवातून त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि कुटुंबीयांनी त्यांचा सन्मानपूर्वक स्वीकार केल्यामुळे या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भाचीमुळे देहदानाचा निर्णय
ग्रामीण भागात आयुष्य व्यतीत केलेल्या वच्छला लिखार यांना त्यांच्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या भाचीमार्फत देहदानाचे महत्त्व समजले. त्यानंतर त्यांनी देहदानाचा ठाम निर्णय घेतला. 'माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीराचा उपयोग डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला, तर त्यापेक्षा मोठे पुण्य नाही,' असा त्यांचा विश्वास होता. याच विचारातून त्यांनी पाच वर्षांपूर्वीच कुटुंबीयांच्या मदतीने देहदानासाठी अर्ज भरून ठेवला होता.दुपारी जेवताना अखेरचा श्वास
२८ मार्च, २०२६ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आयुष्यभर औषधांपासून दूर राहून त्यांनी निरोगी जीवन जगले. नेहमीप्रमाणे दैनंदिन दिनक्रम पूर्ण करून दुपारी जेवताना त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांचे पुत्र आणि कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक विलास लिखार यांनी दिली.नातेवाईकांकडूनही अभिमान व्यक्त
आईच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव नागपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. अंत्यविधीबाबत विचारणा करणाऱ्या नातेवाईकांनाही त्यांच्या देहदानाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अभिमान व्यक्त केला. औपचारिक शिक्षण नसतानाही समाजाला दिशा देणारा इतका विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या वच्छला लिखार प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ हरपला आहे, मात्र त्यांच्या विचारांचा वारसा कायम जिवंत राहणार आहे.तेराव्याचा खर्च वृद्धाश्रमाला
देहदानानंतर पारंपरिक विधी करता येत नसले तरी, रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या केस आणि नखांच्या सहाय्याने त्यांच्या मुलाने पवनी येथील 'विदर्भ काशी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीकाठी प्रतीकात्मक विधी पार पाडले. तसेच, मृत्यूनंतर केला जाणारा तेराव्याचा खर्च वृद्धाश्रमाला दान करावा, ही वच्छला लिखार यांची इच्छा देखील कुटुंबीय पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
