Dailyhunt
BSF New Border Strategy: सीमेच्या रक्षणासाठी नदीत मगरी, साप सोडणार? अवैध घुसखोरी व गुन्हे रोखण्यासाठी बीएसएफकडून पडताळणी

BSF New Border Strategy: सीमेच्या रक्षणासाठी नदीत मगरी, साप सोडणार? अवैध घुसखोरी व गुन्हे रोखण्यासाठी बीएसएफकडून पडताळणी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर नद्यांच्या संवेदनशील भागांत अवैध घुसखोरी आणि सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी मगरी आणि साप सोडण्याच्या शक्यतेचा सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) विचार करत आहे.

दिल्लीत दलाच्या मुख्यालयात ९ फेब्रुवारीला झालेल्या एका बैठकीत या योजनेवर चर्चा झाली होती, यानंतर ४,०९६ किमी लांब सीमेवर तैनात क्षेत्रीय तुकड्यांकडून त्यांचे मत मागवण्यात आले. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सीमेचा सुमारे ८५६ किमी भाग अजूनही कुंपणाविना आहे. घनदाट जंगल, नदी परिसर अशी कठीण भौगोलिक स्थिती यास कारणीभूत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्देशांनुसार मोहिमेसंबंधी यश मिळवण्यासाठी नदीतील संवेदनशील खोऱ्यांमध्ये साप आणि मगरींसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांना सोडण्याच्या व्यवहार्यतेची पडताळणी करावी, असा प्रस्ताव बीएसएफने दिला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नदी प्रदेशात सरपटणाऱ्या प्राण्यांना सोडणे व्यावहारिक नाही. सीमेच्या अनेक भागांत लोक राहतात. असे प्राणी असतील, तर पुराच्या वेळेस समस्या निर्माण होऊ शकतात, असे अनेक स्थानिक कमांडरचे म्हणणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 'हा एक विचार होता. त्यावर फेब्रुवारीमध्ये बीएसएफचे महासंचालक प्रवीण कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली. व्यवहार्यता तपासणे हा त्यामागचा हेतू होता. स्थानिक कमांडरने पाठवलेल्या प्रतिसादाची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ही सीमा सुरक्षित करण्यासाठी विविध तांत्रिक साधने आणि निगराणी उपकरणे तैनात करण्यासंदर्भात इतरही अनेक प्रस्ताव आहेत, असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. भारत-बांगलादेश सीमेवर शेजारच्या देशातून घुसखोरी होण्याची शक्यता असते, तसेच मानवी तस्करी आणि अमली पदार्थ, बनावट भारतीय चलनी नोटा आणि शस्त्रे व दारुगोळा यांची तस्करी यांसारखे सीमापलीकडून गुन्हेदेखील घडतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims