Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Building Collapse: वाचवा, मला वाचवा! ढिगाऱ्यातून हात दिसला, मदतीसाठी आर्त साद; बचाव पथकाच्या अंगावर काटा

Building Collapse: वाचवा, मला वाचवा! ढिगाऱ्यातून हात दिसला, मदतीसाठी आर्त साद; बचाव पथकाच्या अंगावर काटा

दिल्ली: राजधानी दिल्लीत बुधवारी संध्याकाळी रोहिणी परिसरात ५ मजल्यांची निर्माणाधीन इमारत कोसळली. सेक्टर १६ मधील जी-४ मधील निर्माणाधीन इमारत कोसळताच एकच खळबळ उडाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इमारत कोसळताच आरडाओरडा आणि आक्रोश सुरू झाला. आसपासचे लोक घटनास्थळी धावले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आधी स्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर संपूर्ण इमारत कोसळली. धुळीचे लोट पसरले. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिली.

घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथकं दुर्घटनास्थळी पोहोचली. ढिगारा उपसण्यासाठी मोठ्या मशीन आणण्यात आल्या. सोबतच मदत आणि बचाव कार्यदेखील सुरू करण्यात आलं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर शोधून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न प्राधान्यानं सुरू आहेत. रुग्णालय आणि वैद्यकीय पथकंदेखील दुर्घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. जखमींना तातडीनं रुग्णालयात पोहोचवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

मदत आणि बचाव कार्य सुरू असताना एक हृदयद्रावक घटना घडली. ढिगाऱ्याखालून बचाव पथकाला आवाज आला. जिथून आवाज आला, तिथे केवळ हातच दिसत होता. ढिगाऱ्यातून एक जण हात हलवत होता. ढिगाऱ्यात अडकलेला एक जण मदतीची याचना करत होता. कण्हत असलेल्या व्यक्तीचा आवाज बचाव पथकाच्या कानी पडला. 'वाचवा, मला वाचवा', हे शब्द कानी पडताच बचाव पथकानं वायुवेगानं हालचाली केल्या.

ढिगाऱ्यातून बाहेर पडलेला हात आणि आवाज ऐकताच मदत आणि बचाव पथकानं त्याला धीर दिला. 'आम्हाला तुमचा हात दिसतोय. तुम्ही चिंता करतोय. आम्ही तुम्हाला नक्की वाचवू,' असं म्हणत अडकलेल्या व्यक्तीच्या सुटकेचे प्रयत्न सुरू करण्यात आले. ढिगारा हटवण्याचं काम अधिक वेगानं सुरू करण्यात आलं.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी घडली. रोहिणी सेक्टर-१६ मध्ये असलेल्या एमसीडी शाळेच्या जवळ निर्माणाधीन इमारत कोसळली. ढिगाऱ्यात नेमके किती जण अडकले आहेत, याबद्दलची नेमकी माहिती समोर आलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims