Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 2 मजुरांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 2 मजुरांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: भरधाव वेगातील ट्रकने थ्रेशर ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात मलकापूर - मुक्ताईनगर मार्गावर हॉटेल महाराजा रेस्टॉरंटसमोर गुरुवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास झाला.

बाळकृष्ण त्र्यंबक पाचपोर (वय ५०, रा. धरणगाव) व रोहन किसन पाटील (वय २६), अशी मृतांची नावे आहेत. तर, राजू नेरकर (वय ५०), मंगेश विकास पाटील (वय ३०) आणि आकाश रामचंद्र सोनटक्के (वय २८) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

एमएच २८ एझेड ३२५९ क्रमांकाचे हडंबा थ्रेशर ट्रॅक्टर गुरुवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास शेताकडे जात होते. या ट्रॅक्टरला तालसवाडा ते दसरखेडदरम्यान आरजे २९ जीबी ५६७६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने मागेहून जोरदार धडक दिली. यामुळे ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टरचा मागील भाग पूर्णतः चुराडा झाला. गंभीर जखमींना तातडीने मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे, एएसआय विजय टेकाडे, गजानन बावस्कर, राजू साठे, बंटी कोलते, संदेश शिंदे, नीलेश बोंडे आणि अश्विन साठे यांनी मदतकार्य करीत जखमींना दवाखान्यात हलविले. अपघातात ठार झालेले बाळकृष्ण पाचपोर यांना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढावे लागले. अपघातानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक व वाहक फरार झाले.

बुलेट दुभाजकावर धडकली; तरुण ठार, दोघे जखमी
बुलढाणा :
लग्नाला जात असलेल्या तरुणांची भरधाव वेगातील बुलेट दुभाजकावर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास चिखली ते जालना मार्गावर अंढेरा फाट्याजवळ घडली. ओम संजय जामदार (वय २०) असे मृताचे, तर जय जामदार व अभी भवर अशी जखमींची नावे आहेत.

ओमसह जय जामदार व अभी भवर असे तिघेजण गुरुवारी दुपारी चिखली येथून बुलेटने जालना जिल्ह्यातील अंबड येथे एका लग्न समारंभासाठी निघाले. साडेबारा वाजताच्या सुमारास अंढेरा फाटा परिसरात नियंत्रण सुटून बुलेट दुभाजकावर जोरात धडकली. यात तिघेही दूर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. यातील ओम याचा जागीच मृत्यू झाला. तर, जय व अभी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims