Dailyhunt
Buldhana Crime: माझ्याशी लग्न कर नाहीतर..., तरुणाकडून सतत धमकी, कंटाळून 21 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल

Buldhana Crime: माझ्याशी लग्न कर नाहीतर..., तरुणाकडून सतत धमकी, कंटाळून 21 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल

. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: माझ्यासोबत लग्न केले नाही तर फोटो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठविणार, अशा धमक्या तरुणाने दिल्या. याविषयीची माहिती समजताच भावी सासरकडील लोकांनी ठरलेले लग्न मोडले.

ही बाब जिव्हारी लागल्याने तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. जळगाव-जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे ४ एप्रिलच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

गायत्री (वय २१) या तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गौरव खंडारे (वय २२) याच्याविरुद्ध जळगाव-जामोद पोलिसांनी बीएनएस कलम १०८, ३५१ (२) नुसार गुन्हे दाखल केले. जळगाव-जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील गायत्रीचे लग्न ९ मे रोजी ठरले होते. गावातीलच गौरव खंडारे (वय २२) याला गायत्रीचे लग्न ठरल्याची माहिती समजल्यानंतर त्याने त्रास द्यायला सुरुवात केली.

मुलीने ही बाब घरच्यांना सांगितल्यानंतर त्याला समजविण्यात आले होते. त्यानंतरही त्याने त्रास सुरूच ठेवला. तुझे माझ्यासोबतचे फोटो होणाऱ्या नवऱ्याला पाठवून देण्याच्या धमक्या दिल्या. ही बाब समजल्यानंतर होणाऱ्या सासरच्यांनीदेखील लग्न मोडले. यामुळे हताश झालेल्या गायत्रीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

तर दुसऱ्या एका घटनेत, गोंडपिपरी रस्त्यावर धनापूरजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला तर त्यांची सहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. गौतम सुरेश निमसरकर (३५) आणि वैशाली गौतम निमसरकर (३२) रा. आंखोडा (जि. गडचिरोली) अशी मृतांची नावे आहेत. मुलगी सिया (६) ही जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. निमसरकर कुटुंब दुपारी ४ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून चंद्रपूरच्या दिशेने जात असताना, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकची त्यांना धडक दिली. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims