HSC Result 2026 Success Story: कर्करोगासारखा आजार म्हणजे थांबणे, असा समज अजूनही अनेकांच्या मनात आहे. मात्र, लहान वयात या गंभीर आजाराशी सामना करीत शारीरिक वेदना आणि मानसिक ताण सोसत शहरातील दोन तरुणींनी आपली स्वप्ने जिवंत ठेवली.
त्यासाठी या दोघी आपापल्या स्तरावर झगडल्या. एलएडी कॉलेजची कला शाखेची विद्यार्थिनी भूमी कोने व रिचा द्विवेदी या दोघींची ही प्रेरणादायी कहाणी.
जिद्दीने ती लढली अन् जिंकलीही
भूमीला अवघ्या पाचव्या वर्षी रक्ताचा कर्करोग झाला. उपचारांनंतर ती बरी झाली. मात्र, काही वर्षांनी आजाराने पुन्हा डोके वर काढले. दुसऱ्यांदा 'रिलॅप्स' झाल्यानंतर नातेवाइकांनी आशा सोडली होती. 'आता खर्च करू नका', असा सल्लाही आईला देण्यात आला. मात्र, आईने हार मानली नाही. तिने नेटाने उपचार सुरू ठेवले आणि अखेर भूमीने पुन्हा कर्करोगावर मात केली. आजही तिच्या डोक्यात कलेक्शन असल्याने तिला सतत डोकेदुखीचा त्रास होतो. अभ्यासात अडथळे येतात. तरीही आईसोबत आजी-आजोबांच्या आधाराने ती पुढे जात आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यानही तिला तापाने ग्रासले होते. अशा रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने त्रास अधिक होतो. पण भूमीने हार मानली नाही. जिद्दीने परीक्षा देत तिने ७५.६७ टक्के गुण मिळवले.भूमी म्हणते, 'आता माझी स्वप्ने मोठी आहेत. नाट्यक्षेत्रात मला करिअर करायचे आहे. आयुष्याने दिलेल्या कठीण प्रसंगांमधून मला एकच संदेश मिळाला आहे. कर्करोगच नाही तर कोणत्याच संकटाला घाबरण्याची गरज नाही. मी तर कर्करोगातून दोनदा बरी झाले आहे. या रोगाशी दोन हात करून आपले ध्येय गाठणे शक्य आहे.'
रक्ताच्या कर्करोगाशी झुंज अन् परीक्षेत यश
बारावी हे विद्यार्थ्यांच्या करिअरला कलाटणी देणारे वर्ष मानले जाते. रिचा द्विवेदीच्या आयुष्यात दुखरे वळण आले. तिला याचवर्षी रक्ताच्या कर्करोगाशी झुंज द्यावी लागली. तिच्या मित्र, मैत्रिणी अभ्यासात गुंतलेल्या असताना ती रुग्णालयाच्या फेऱ्या मारत होती आणि किमोथेरपीच्या वेदना सहन करत होती. तरीही जिद्द न सोडता तिने बारावीच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. बारावीचे शैक्षणिक वर्ष सुरू असतानाच रिचाला आजाराचे निदान झाले. उपचारांमुळे होणारा थकवा आणि मानसिक ताण यामुळे शिक्षण खंडित होण्याची भीती होती. मात्र, शिक्षकांचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर तिने हा संघर्ष पार केला.एकमेकींचा हात धरला अन् यशाचं शिखर गाठलं! बारावी निकालात 'या' मुलींनी मिळवलेले गुण पाहून डोळे पाणावतील
रिचाचे वडील खासगी नोकरीत असून आई गृहिणी आहे. चित्रकला आणि स्वयंपाक हे तिचे छंद आहेत. पुढे डॉक्टर होऊन कर्करुग्णांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील इतिहास शिक्षक विनीत झांबरे म्हणाले, 'कर्करोगाच्या उपचारात रुग्णाचे मनोबल टिकवणे कठीण असते. मात्र, रिचाने आजाराला आपल्या ध्येयाआड येऊ दिले नाही. तिच्यासाठी परीक्षा ही केवळ गुणांची नव्हे, तर सकारात्मकतेची लढाई होती.'

