जयपूर: मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. राजस्थानच्या अलवरमध्ये लक्ष्मणगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजपूरजवळ धावत्या कारनं पेट घेतला. बघता बघता अग्निकल्लोळ वाढत गेला.
कारमधील पाच जण जिवंत जळाले. यामध्ये तीन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. हे सगळे जण मध्य प्रदेशच्या श्योपूरचे रहिवासी होते. त्यांची कार मुंबईच्या दिशेनं येत होती. वैष्णोदेवीचं दर्शन करत संपूर्ण कुटुंब परतीचा प्रवास करत होतं.
हा भीषण अपघात रात्री ११ च्या सुमारास मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेवर चॅनल नंबर ११५/३०० च्या जवळ झाला. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार सीएनजी आणि पेट्रोल दोन्हीवर चालणारी होती. एक्स्प्रेस वेवर असताना कारमधून अचानक सीएनजीची गळती सुरु झाली. त्यानंतर कारला आग लागली. अवघ्या काही सेकंदांमध्ये पूर्ण कारला आग लागली. त्यामुळे कारमधील कोणालाही जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यातील चैनपुरा गावात राहणारं कुटुंब वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते. हे कुटुंब भाड्याच्या टॅक्सीनं आपल्या गावी परतत होते. रात्री उशिरा त्यांची कार अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली. मौजपूरच्या जवळ त्यांच्या कारनं पेट घेतला. अपघातावेळी कुटुंबातील बहुतांश जण झोपेत होते. अतिशय कमी वेळात संपूर्ण कारनं पेट घेतला. त्यामुळे कोणालाही जीव वाचवण्यासाठी हालचालच करता आली नाही.
आग लागल्याचं लक्षात येताच चालक विनोद कुमारनं धावत्या कारमधून उडी टाकली. त्याचा जीव वाचला. पण तो ८० टक्के भाजला. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची स्थिती नाजूक असल्यानं त्याला जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
आग इतकी भीषण होती की कारमधील पाचही जणांचा जळून अक्षरश: कोळसा झाला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाच जणांचे अवशेष गोळा करणं अतिशय अवघड होतं. त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकाला अपघातस्थळी पाचारण करण्यात आलं आहे.
अपघाताची माहिती मिळताच लक्ष्मणगढ ठाण्याचे पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाची पथकं घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलानं प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग विझवली. आग अतिशय वेगात पसरल्यानं कोणाचाही जीव वाचला नाही. अलवरचे पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी, डीएसपी कैलाश जिंदल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.

