Dailyhunt
Chhatrapati Sambhajinagar: महापालिकेने केल्या 23 शाळा बंद! समायोजनाच्या नावाखाली निर्णय, मराठी 17 शाळांचा समावेश

Chhatrapati Sambhajinagar: महापालिकेने केल्या 23 शाळा बंद! समायोजनाच्या नावाखाली निर्णय, मराठी 17 शाळांचा समावेश

. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: महापालिका प्रशासनाने समायोजनाच्या नावाखाली २३ शाळा बंद केल्या आहेत. बंद करण्यात आलेल्या शाळांमध्ये १७ शाळा मराठी माध्यमाच्या तर सहा शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत.

सध्या पन्नास शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांची नव्वदच्या दशकातील संख्या ८२ च्या घरात होती. त्यानंतर पालिकेने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे कारण पुढे करीत एक एक शाळा बंद करण्याचा सपाटा सुरू केला. आता महापालिकेकडे त्या ८२ शाळांची माहितीदेखील उपलब्ध नाही. साधारण ७३ शाळांची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहे. एकूण ७३ शाळांपैकी आता केवळ पन्नास शाळा सुरू आहेत. उर्वरित शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

महापौर समीर राजूरकर यांनी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी संबंधित नगरसेवकाला सर्वसाधारण सभेच्या काही दिवस आधी सचिव विभागाकडे प्रश्न द्यावे लागतात. महापौरांच्या संमतीने प्रश्न सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट केले जातात. एमआयएमचे नगरसेवक ओसामा अब्दुल कदीर यांनी महापालिकेच्या शाळांबद्दल प्रश्न विचारला होता. त्यात त्यांनी सध्या किती शाळा सुरू आहेत, किती शाळा बंद करण्यात आल्या, किती शाळांच्या जागा खासगी संस्थेला देण्यात आल्या या आशयाचे प्रश्न विचारले होते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण विभागाने २३ शाळा बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे या शाळा अन्य शाळांमध्ये समायोजित करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. बंद करण्यात आलेल्या शाळांमध्ये १७ शाळा मराठी माध्यमाच्या तर सहा शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत. शाळा बंद करण्यापेक्षा त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न का करीत नाही असा प्रश्न विचारला जात आहे विद्यार्थी संख्या वाढवण्याचा प्रयत्न केल्यास शाळा बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर येणार नाही.


बंद केलेल्या शाळा व त्यांचे माध्यम
प्राथमिक शाळा नागेश्वरवाडी - मराठी
प्राथमिक शाळा किराडपुरा नं ३ - मराठी
प्राथमिक शाळा सिडको एन ९ - मराठी
प्राथमिक शाळा विठ्ठलनगर - मराठी
प्राथमिक शाळा भारतनगर नं. २ - मराठी
प्राथमिक शाळा जवाहर कॉलनी - मराठी
प्राथमिक शाळा देवळाई म्हाडा - मराठी
प्राथमिक शाळा शहानुरवाडी - मराठी
प्राथमिक शाळा रोहिदासपुरा - मराठी
प्राथमिक शाळा खोकडपुरा - मराठी
प्राथमिक शाळा प्रियदर्शिनी इंदिरानगर - उर्दू
प्राथमिक शाळा चिकलठाणा - उर्दू
केंद्रीय प्राथमिक शाळा सिडको एन १२ - मराठी
प्राथमिक शाळा विष्णूनगर - मराठी
प्राथमिक शाळा सिल्लेखाना - उर्दू
प्राथमिक शाळा जिन्सी / रेंगटीपुरा - उर्दू .
प्राथमिक शाळा शहासोक्ता कॉलनी - उर्दू
प्राथमिक शाळा हनुमाननगर - मराठी
प्राथमिक शाळा भारतनगर नं १ - मराठी
प्राथमिक शाळा शताब्दिनगर - मराठी
प्राथमिक शाळा रोजाबाग - उर्दू
प्राथमिक शाळा संजयनगर - मराठी
प्राथमिक शाळा नूतन कॉलनी - मराठी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims