छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस आहे. ही जागा महायुतीतून शिवसेना लढणार की भाजप?
याचा सस्पेन्स रविवारीही कायम होता. भाजपकडे जागा आल्यास कोण आणि शिवसेनेकडून कोण रिंगणात उतरणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. इच्छुकांचे डोळे मुंबईकडून येणाऱ्या निरोपाकडे लागलेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी थेट उमेदवारी जाहीर करून पक्षांतर्गत तसेच मित्रपक्षातील संघर्ष टाळण्याचा महायुतीतील पक्षांचा प्रयत्न आहे.
मागच्या वेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संख्याबळावर भाजपने जागेचा दावा केला आहे. शिवसेनेकडून मात्र ही जागा आमची असल्याचे सांगून जागा आमचीच असल्याचे म्हणणे मांडलेले आहे. आकडेवारीत भाजप सरस असल्याचा दावा करुन भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
दुसरीकडे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा आपल्याकडे राहावी यासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे. महायुतीतील दोन्ही पक्षांकडून केले जाणारे दावे - प्रतिदावे आणि दिवसागणिक इच्छुकांची वाढणारी नावे स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे.
उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजप इच्छुकांपैकी कुणी अद्याप उमेदवारी अर्ज घेतलेला नाही. शिवसेनेकडून मात्र अनेकांनी अर्ज नेलेले आहेत. दोन्ही कडील इच्छुक श्रेष्ठींच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले आहेत.
दरम्यान, जागावाटपाचा तोडगा नेमका निघाला की नाही याविषयी माहिती मिळू शकली नाही. सोमवारी सकाळी पहिल्या टप्प्यात उमेदवाराचे नाव जाहीर होऊ शकते, त्यानंतरच ही जागा शिवसेनेने राखली की भाजपने खेचून घेतली हे कळणार आहे. महायुतीचा उमेदवार निश्चित न झाल्याने महाविकास आघाडीनेही आपले पत्ते अजून ओपन केलेले नाहीत. एकूणच सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणापर्यंत राजकीय वातावरण गरम राहणार आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या 16 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याशेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत जागावाटपात महायुतीत रस्सेखीच सुरु आहे. पण महायुतीचं आता जागावाटप निश्चित झाल्याची चर्चा आहे.अर्थात याबाबतच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.त्यामुळे या निवडणुकीबाबत सस्पेन्स संपलेला नाही. महायुतीत सुरु असलेल्या घडामोडींकडे महाविकास आघाडीचे सुद्धा लक्ष आहे. कारण महाविकास आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. आता उमेदवार कोण असणार? याचे उत्तर उद्याच मिळण्याची शक्यता आहे.

