नागपूर : नागपूरच्या धंतोली परिसरातून एकाच कुटुंबातील पाच जण अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ जूनपासून हे पाचही सदस्य घरातून निघून गेल्यानंतर परतले नसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात बेपत्ता सदस्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धंतोलीतील बलराज मार्गावरील प्लॉट क्रमांक ४० येथील 'दुर्गा सदन'मध्ये तक्रारदार श्यामसुंदर कीमतराय परसवानी (७१) यांचे कुटुंब राहते. त्याच इमारतीत त्यांचे दिवंगत भाऊ सुरेश कीमतराय परसवानी यांच्या कुटुंबातील सदस्यही राहत होते. हर्षा सुरेश परसवानी (५७), जितेंद्र सुरेश परसवानी (४२), ईशिता जितेंद्र परसवानी (४०), खुशी जितेंद्र परसवानी (२१) आणि एक अल्पवयीन मुलगा असे पाच जण बेपत्ता झाले आहेत.
२४ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हे पाचही सदस्य घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. सुरुवातीला ते नातेवाईकांकडे किंवा इतर परिचितांकडे गेले असावेत, असा कुटुंबीयांचा समज होता. त्यामुळे काही दिवस त्यांनी स्वतःच विविध ठिकाणी शोधाशोध केली. मात्र त्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधूनही त्यांची कोणताही माहिती मिळाली नाही. अखेर २९ जून रोजी श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची अधिकृत तक्रार दाखल केली.
तक्रार नोंद होताच धंतोली पोलिसांनी तपासाची सुरू केला आहे. त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, बेपत्ता सदस्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार पुणे पोलिसांशीही समन्वय साधला जात असल्याची माहिती आहे .
दरम्यान, कुटुंबातील एका सदस्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याची माहितीही तपासादरम्यान पुढे आली आहे. मात्र, बेपत्ता होण्यामागे हेच कारण आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत माहिती मिळालेली नाही, या सर्व अनुषंगाने धंतोली पोलिस तपास करत आहे.

