Dailyhunt
Crime News : जेवणात केस सापडला, नवऱ्याकडून मारहाण, 25 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं, सासरच्या सात जणांवर गुन्हा

Crime News : जेवणात केस सापडला, नवऱ्याकडून मारहाण, 25 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं, सासरच्या सात जणांवर गुन्हा

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरातील भावसिंगपुरा भागातील श्रावस्ती कॉलनी परिसरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जेवणात केस सापडल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पतीने अमानुष मारहाण केली.

सासरी सततच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. या प्रकरणी छावणी पोलिसांनी मृत महिलेचा पतीसह सासरच्या सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

ईश्वरी अजय बनकर, वय २५ वर्ष, असं मयत विवाहितेचं नाव आहे. तर अजय बनकर, दिनेश बनकर, दिलीप बनकर, चंद्रमणी बनकर, छाया बनकर, आशिष बनकर आणि गणेश बनकर अशी आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वरी आणि अजय यांचा विवाह २८ जून २०२० रोजी मोठ्या थाटामाटात झाला होता. अजय हा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान म्हणून कार्यरत आहे. लग्नावेळी ईश्वरीच्या वडिलांनी ५ तोळे सोने, २ लाख रुपये रोख आणि सर्व घरगुती साहित्य दिले होते. तरीही, अजयला आपल्या नावावर घेतलेल्या प्लॉटचे हप्ते फेडण्यासाठी माहेरून पैशांची अपेक्षा होती. यासाठी तो वारंवार ईश्वरीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे.

त्या रात्री काय घडलं?

६ एप्रिलच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास अजय जेवायला बसला असताना भाजीमध्ये केस सापडला. यावरुन त्याने संताप व्यक्त करत ईश्वरीला जबर जखमी होईपर्यंत मारहाण केली. ७ एप्रिलच्या सकाळीही त्याने पुन्हा वाद घालून तिला गंभीर आरोप करत छळले. सासरच्या इतर नातेवाईकांकडूनही तिला सतत टोमणे मारले जात होते. अखेर हा त्रास असह्य झाल्याने ईश्वरीने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला.

माहेरच्यांचा संतप्त पवित्रा

ईश्वरीच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात मोठा संताप व्यक्त केला. सासरच्या लोकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून छावणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती अजय बनकर, दिनेश बनकर, दिलीप बनकर, चंद्रमणी बनकर, छाया बनकर, आशिष बनकर आणि गणेश बनकर यांच्यावर जीव देण्याला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.


सर्व सातही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हुंडा आणि सोन्या-चांदीचे दागिने दिल्यानंतरही एका तरुण मुलीला आपल्या प्राणास मुकावे लागल्याने संपूर्ण शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims