सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकमधून राज्यातील चडचण (जी.विजापूर राज्य कर्नाटक) मन विचलित करणारी घटना घडली आहे. विजयपूर जिल्ह्यातील गोविंदपूर भागामध्ये ६ जणांची हत्या करण्यात झाल्याने सोलापूर सह विजापूर जिल्हा हादरला आहे.
कोयत्याने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यापासून अगदी जवळ असलेल्या मौजे निवरगी येथे (तालुका - चडचण, जिल्हा - विजापूर, कर्नाटक) येथे सहा जणांना सामूहिकरित्या संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शेतीच्या कारणावरून सहा जणांना कोयत्याने घाव घालून ठार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास हे हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे. निराळे कुटुंबातील पाच जण आणि आणखी एका व्यक्तीचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा नीराळे, दुंडप्पा रेवण सिद्धप्पा नीराळे, शिवपुत्र नीराळे, चंद्रशेखर नीराळे, राहुल नीराळे, शब्बीर अत्तार(सर्व राहणार चडचण जी विजयपूर , राज्य.कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतीच्या कारणावरून ही हत्याकांडची घटना घडली आहे. घटनास्थळी विजापूर पोलिसांची पोलीस टीम दाखल झाली असून पंचनामा सुरू आहे. वादात असलेली 25 एकर शेतजमीन नीराळे कुटुंबाने काही दिवसांपूर्वी विकत घेतली होती. अनेक वर्षांपासून या शेतजमिनीचा वाद सुरू होता.
वादातील जमीन खरेदी केली; शुक्रवारचा दिवस काळ ठरला
काही महिन्यांपूर्वी तेली कुटुंबाने ही जमीन चडचण येथील निराळे कुटुंबाला विकली होती. शुक्रवारी चडचण येथील नीराळे कुटुंबातील सदस्य शेतजमीन पाहण्यासाठी आणि तेथील झाडेझुडपे स्वच्छ करण्यासाठी गेले होते. चडचण येथील शब्बीर अत्तार यांचा लाकूडअड्डा आहे, निराळे कुटुंबाने शब्बीर आत्तार यांना सोबत घेऊन गेले आणि तेथील लाकडे विकून फायदा कमविण्याचा उद्देश होता.
वादात असलेल्या शेतजमिनीवर पाय ठेवताच निराळे कुटुंबावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की सहा जण जागीच ठार झाले. खून करण्यासाठी आरोपींनी ऊस तोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोयत्याचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराबाबत सध्या कोणतीही स्पष्ट दुखापत मृतदेहावर वरवर पाहणीमध्ये आढळलेली नाही. मात्र, गोळीबार झाला होता की नाही याची खात्री शवविच्छेदन अहवालानंतरच होणार आहे.

