Dailyhunt
Crime News : मी तुमच्यावर खूप प्रेम करते. पती प्रतिसाद देईना; चिठ्ठी लिहित 28 वर्षीय तरुणीने माहेरी आयुष्य संपवलं

Crime News : मी तुमच्यावर खूप प्रेम करते. पती प्रतिसाद देईना; चिठ्ठी लिहित 28 वर्षीय तरुणीने माहेरी आयुष्य संपवलं

नागपूर : पतीवरील प्रेम व्यक्त करताना मनातील खोल वेदना आणि तणाव शब्दाद्वारे व्यक्त करणारी एक हृदयद्रावक चिठ्ठी लिहिली. त्यानंतर २८ वर्षीय विवाहितेने माहेरी येऊन गळफास घेत आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील महादुला (कोराडी) परिसरातील झेंडा चौक येथे उघडकीस आली आहे.

मयुरी संदीप मेंढे (मानवटकर) असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी ही काही दिवसांपासून आपल्या आईकडे महादुला येथे राहत होती. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. सुमारे महिनाभरापूर्वीच ती माहेरी परतली होती. या काळात तिने पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने तिची मानसिक अवस्था अधिक खालावली असल्याचे बोलले जात आहे.

शनिवारी रात्री मयुरीची आई आणि भाऊ हे परिसरात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत मयुरीने स्वतःला खोलीत बंद करुन घेतलं. त्यानंतर स्वतःच्या ओढणीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेत जीवन संपवले.

शेवटची चिठ्ठी सापडली

जीव देण्यापूर्वी मयुरीने काही ओळखीच्या व्यक्तींना तसेच पतीला फोन केले होते. मात्र पतीने फोन न उचलल्याने ती अधिकच हताश झाली होती. याच अवस्थेत तिने एक भावनिक नोट लिहिली. "मी तुमच्यावर खूप प्रेम करते…" अशा शब्दांत तिने पतीवरील प्रेम व्यक्त करतानाच आपल्या मनातील दुःख, एकटेपणा आणि तणाव मांडला. या चिठ्ठीतून तिच्या अंतर्मनातील संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो.

दरम्यान, रात्री उशिरा घरातील सदस्य परतले असता दरवाजा आतून बंद असल्याने संशय आला. बराच वेळ आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. आतमध्ये मयुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तत्काळ खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणात माहेरच्यांनी पतीकडून मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चिठ्ठी जप्त केली असून भावाच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला आहे. कोराडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण, पती-पत्नीतील वाद आणि चिठ्ठीतील मजकूर यांचा सखोल तपास सुरू आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims