Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Crime News: 'मृत' प्रियकराच्या लग्नाला प्रेयसी पोहोचली; मंडपात हायव्होल्टेज ड्रामा, नवरदेव थेट तुरुंगात

Crime News: 'मृत' प्रियकराच्या लग्नाला प्रेयसी पोहोचली; मंडपात हायव्होल्टेज ड्रामा, नवरदेव थेट तुरुंगात

खनऊ: प्रेम, सोबत राहण्याच्या आणाभाका, लग्न, विश्वासघात आणि सुनियोजित कट.. या सगळ्या घटना, घडामोडी असलेली एक कहाणी समोर आली आहे. ही कहाणी ऐकून अनेकांना धक्का बसला. एका चतुर प्रियकरानं त्याच्या जुन्या प्रेयसीपासून पिच्छा सोडवण्यासाठी स्वत:च्या मृत्यूची खोटी कहाणी रचली.

यात त्याला कुटुंबियांनीदेखील साथ दिली. एका भीषण रस्ते अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याचं प्रेयसीला सांगण्यात आलं. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच्या निधनाची वार्ता कानावर पडताच प्रेयसीला धक्का बसला. तर दुसरीकडे तरुणानं शहरातील सावरिया मॅरेज हॉलमध्ये दुसऱ्या तरुणी सोबत लग्नाची तयारी सुरू केली. नवरदेव होऊन तो मंडपात बसला. हा सगळा नाट्यमय घटनाक्रम उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात घडला.

हरिपाल नावाच्या तरुणाचे त्याच्याच गावातील एका तरुणीशी बऱ्याच कालावधीपासून प्रेमसंबंध होते. तरुणीनं त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. हरिपालला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे त्यानं चक्रावून टाकणारा कट रचला. आंबेडकरनगर जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची खोटी कहाणी त्यानं तयार करण्यात आली. ही बातमी त्याच्या प्रेयसीपर्यंत पोहोचली. हरिपालच्या निधनाबद्दल समजताच तिला जबर मानसिक धक्का बसला. ती धाय मोकलून रडू लागली.

या सगळ्या घटनाक्रमाला एक नाट्यमय वळण मिळालं. तुझा प्रियकर अगदी ठणठणीत असून तो जिवंत आहे आणि बस्ती जिल्ह्यातील सांवरिया मॅरेज हॉलमध्ये एका तरुणी सोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे, ही माहिती कोणीतरी तरुणीला दिली. प्रियकरानं रचलेल्या कटाचा सुगावा लागताच तरुणीनं थेट पोलीस ठाणं गाठलं. सगळा घटनाक्रम त्यांच्या कानावर घातला. प्रकरणाचं गांभीर्य पाहता पोलिसांनी हालचाली सुरू केल्या. तरुणीला घेऊन त्यांनी सांवरिया मॅरेज हॉल गाठला. तिथे हरिपाल मुंडावळ्या बांधून लग्नविधी करत होता.

प्रेयसीची मंडपात एन्ट्री होताच एकच गोंधळ झाला. प्रेयसीनं तरुणानं रचलेला कट सगळ्यांसमोर आणला. पोलिसांनी लग्न थांबवलं आणि हरिपालला ताब्यात घेतलं. त्याला सोबत नेलं. हरिपालच्या कुटुंबानं या सगळ्यात त्याला साथ दिल्याचा आरोप प्रेयसीनं केला. रस्ते अपघातात हरिपालचा मृत्यू झाल्याची माहिती तिला कुटुंबातील काही सदस्यांनीच दिली होती.

प्रेयसीच्या वडिलांनी या प्रकरणी हरिपालच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वधू पक्षानंदेखील हरिपाल विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्याकडून लग्न मोडण्यात आलं आहे. या प्रकरणी योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलीस उपअधीक्षक भूषण तिवारी यांनी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims