लखनौ : पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर घराला बाहेरुन कडी लावून पतीने पळ काढला. उत्तर प्रदेशातील झाशी शहरातील सिपरी बाजार परिसरात ही घटना घडली. शिवानी ऊर्फ सुधा (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे.
ती मूळची मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील इंदरगड येथील रहिवासी होती. गेल्या तीन महिन्यांपासून ती एका भाड्याच्या घरात आपली धाकटी बहीण मुस्कान आणि भाऊ अनिकेत यांच्यासोबत राहत होती. तिचा पती यश ठाकूर हा ग्वाल्हेरचा रहिवासी असून तो अधूनमधून झाशीला येत असे.
शिवानीची बहीण मुस्कान हिने सांगितले की, रविवारी रात्री शिवानी आणि तिचा पती यश यांच्यात वाद झाला होता. गोंधळ ऐकून जवळच राहणारे त्यांचे मामा संतोष तिथे आले आणि त्यांनी दोघांची समजूत काढली. त्यानंतर धाकटा भाऊ अनिकेत मामाच्या घरी गेला. तर शिवानीने रात्रीचे जेवण बनवले. ते जेवून सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले.
दरवाजाला बाहेरुन कडी
मुस्कानच्या म्हणण्यानुसार, पहाटे २ च्या सुमारास यश आपली बॅग आणि काही सामान घेण्यासाठी आला आणि त्याने दरवाजा उघडण्यास सांगितले; तो दरवाजा थोडासा उघडा ठेवून बाहेरच उभा राहिला. सामान दिल्यानंतर मुस्कान पुन्हा झोपायला गेली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास तिला जाग आली तेव्हा तिला तिच्या खोलीला बाहेरुन कडी लावलेली आढळली. वारंवार हाक मारुनही दरवाजा उघडला नाही. अर्धा तास प्रयत्न करुनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ती पुन्हा झोपली.त्यांचा भाऊ अनिकेत याने सांगितले की, तो सकाळी ९ वाजताच्या सुमारास घरी परतला. त्याला दिसले की शिवानीच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती. कडी उघडून आत गेल्यावर त्याला शिवानी जमिनीवर पडलेली दिसली; तिच्या कानातून रक्त येत होते आणि मानेवर जखमेच्या खुणा होत्या.
अनिकेतने दुसऱ्या खोलीची कडी उघडली आणि मुस्कानला उठवले. त्यानंतर शेजारी आणि नातेवाईकांच्या मदतीने शिवानीला मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलें मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी बॉडी ताब्यात घेतला शवविच्छेदन केले. शिवानीची गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून सध्या तिचा पती यश ठाकूर याचा शोध घेत आहेत.
सोशल मीडियावर मैत्री; दीड वर्षापूर्वी विवाह
मुस्कानने सांगितले की, शिवानीची यशशी ओळख सुमारे दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाद्वारे झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले आणि कुटुंबीयांच्या संमतीने सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांनी लग्न केले. लग्नानंतर शिवानी पतीसोबत ग्वाल्हेरला राहू लागली.तिथे किरकोळ कारणांवरून तिचा शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. या त्रासामुळे ती सुमारे तीन महिन्यांपूर्वी झाशीला परतली होती. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी शिवानी तिचा धाकटा भाऊ कपिलसोबत ग्वाल्हेरला गेली होती. तिथे दोन दिवस राहिल्यानंतर ती पतीसोबत झाशीला परतली. त्यानंतर रविवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि सोमवारी सकाळी शिवानीचा मृत्यू झाला.
चार बहिणींमध्ये शिवानी सर्वात मोठी होती
शिवानी चार बहिणींमध्ये सर्वात मोठी होती. तिच्या प्रीती आणि नेहा या धाकट्या बहिणी विवाहित आहेत, तर १८ वर्षांची मुस्कान अविवाहित आहे. तिला अनिकेत (१७) आणि कपिल (१४) असे दोन भाऊ होते. तिचे वडील संतराम वंशकार हे फळविक्रेते आहेत, तर आई दिल्लीत घरकाम करते. शिवानीच्या मृत्यूमुळे कुटुंब कोलमडून गेले आहे.
