Bitcoin Price Today: क्रिप्टो बाजारात पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यापासून क्रिप्टो तसेच शेअर बाजारांमध्ये अस्थिरता पसरली असून गुरुवार, 28 मे रोजी, बाजारात इतकी तीव्र पडझड झाली की गुंतवणूकदारांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही.
सोशल मीडिया आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर घबराट स्पष्ट दिसत होती. अनेक गुंतवणूकदारांना बिटकॉइन नवीन विक्रमी उच्चांकी झेप घेण्याची आशा होती, पण अचानक विक्रीच्या लाटेमुळे वातावरण पूर्णपणे बदलून टाकले.
बिटकॉइनच्या किंमतीत जोरदार आपटी
ट्रेंडीग दरम्यान बिटकॉइनची किंमत 2 टक्के घसरणीसह 74,000 डॉलर्सवर काली उतरली जी 20 एप्रिलनंतरची नीचांकी मानली जात आहे. दुसरीकडे, जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, इथरमध्येही 2% हून अधिक घसरण झाली. अशा परिस्थितीत, प्रश्न उपस्थित होतो की क्रिप्टो मार्केटमध्ये इतकी अचानक घसरण होण्यामागे कारण काय? 60 मिनिटांत असं काय घडलं ज्यामुळे बाजार हादरला...क्रिप्टो मार्केटमधील मोठ्या संख्येने ट्रेडर्स लिव्हरेजचा वापर करून बुलिश पोझिशन्स घेत होते. म्हणजेच, बिटकॉइन वेगाने वाढेल या आशेने ट्रेडिंग केले होते. पण, बिटकॉइनने $74,000 च्या आसपासची महत्त्वाची सपोर्ट लेव्हल तोडताच विक्रीचा वेग वाढू लागला ज्यामुळे आपोआप लिक्विडेशन सुरू झाले. सोप्या शब्दात बोलायचे तर क्रिप्टो एक्सचेंजवरील किमती झपाट्याने खाली येतात आणि ट्रेडर्सकडे पुरेसे मार्जिन उरत नाही, तेव्हा सिस्टम आपोआप पोझिशन्स बंद करते. परिणामी काही मिनिटांत 2,208 कोटींच्या लॉंग पोझिशन्सची विक्री झाली आणि क्रिप्टो बाजारात तेजीची अपेक्षा करणाऱ्यांना सर्वात मोठा फटका बसला.
बिटकॉइनची किंमत $74000 च्या खाली घसरली, पण त्यानंतरही दबाव कायम राहिला आणि सुमारे 73000 डॉलर्सपर्यंत किंमतीत घसरण झाली. चार्टवरून बाजारात केवळ सामान्य विक्रीच नव्हे, तर घाबरून विक्री होत असल्याचे दिसून आले.
अमेरिका-इराण तणावाने वाढले क्रिप्टो बाजाराचे टेन्शन
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव क्रिप्टो बाजारातील दबावाला कारणीभूत ठरत आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी बिघडल्यास त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची गुंतवणूकदारांना भीती सतावत असून, विशेषतः तेलाच्या किमती वाढण्याची जास्त भीती आहे.
तेलाच्या किमती वाढल्यास जागतिक चलनवाढ (महागाई) होऊ शकते, ज्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक, फेड रिझर्व्ह, व्याजदर वाढवू शकते किंवा दीर्घकाळ उच्च पातळीवर ठेवू शकते. परिणामी गुंतवणूकदार आता जोखमीच्या मालमत्तांमधून पैसे काढून घेत आहेत तर, क्रिप्टोकरन्सी सर्वात जोखमीच्या गुंतवणूक पर्यायांपैकी आहे त्यामुळे भीती वाढली की क्रिप्टो बाजारात अनेकदा सर्वात आधी विक्री होताना दिसेल.

