नवी दिल्ली : दिल्लीतील साकेत परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे.
जखमींपैकी १० जणांवर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांची कॅन्टीन कोसळली
दक्षिण दिल्लीचे डीसीपी अनंत मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेली इमारत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या कॅन्टीनसाठी वापरली जात होती. त्यामुळे दुर्घटनेवेळी अनेक विद्यार्थी इमारतीत उपस्थित होते. अपघातानंतर काही विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.
एनडीआरएफ, अग्निशमन दल, डीडीएमए आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे बचावकार्य हाती घेतले. जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला.
दोषींवर कारवाईचा इशारा
घटनेनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली. अनधिकृत बांधकामांना परवानगी देणारे अधिकारी आणि बेकायदेशीर बांधकामात सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी सांगितले की, शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
दूरदर्शन भवनाजवळही दुर्घटना
दरम्यान, दिल्लीत इमारती कोसळणारी ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटनांनाी शहर हादरले आहे. अनेकांचे त्यात जीवही गेले आहेत. आजच दिल्लीतील टिळक मार्ग परिसरात दूरदर्शन भवनाच्या इमारतीवरून दगड कोसळून नीरज कुमार (३५) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीत इमारती कोसळण्याच्या घटना वाढल्या
एप्रिल २०२५ मध्ये दिल्लीच्या मुस्तफाबाद परिसरात चार मजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये वेलकम भागात चार मजली इमारत कोसळल्याने सहा जणांचा जीव गेला होता. आता साकेतमधील दुर्घटनेनंतर राजधानीतील जुन्या आणि अनधिकृत बांधकामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

