लखनऊ: एलओसीवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भूमाफियांनी जमिनीवर कब्जा केल्याचा, वृद्ध आई-बापासह गर्भवती बहिणीला मारहाण झाल्याचा आरोप जवान वीर बहादूर सिंह यांनी केला.
यानंतर सलेमपूरचे सीओ गौरव सिंह यांनी तपासानंतर संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकला आहे.
व्हायरल व्हिडीओतून वीर बहादूर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना साकडं घातलं. १७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या भेटीचा आणि लष्करातून दोनदा पाठवण्यात आलेल्या पत्राचाही संदर्भ दिला. घरात वृद्ध आई-बाप, एक गर्भवती बहीण आणि एक धाकटी बहीण आहे. त्यांना काका मारहाण करतो, असा दावा जवानानं केला. मी सीमेवर देशाचं रक्षण करू की कुटुंबाची चिंता करू, असा उद्विग्न सवाल सिंह यांनी उपस्थित केला. भूमाफियांना गोळ्या घालायची किंवा मग स्वत:वर गोळी झाडायची भाषा त्यांनी केली. त्यामुळे विषयाचं गांभीर्य वाढलं.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सलेमपूरचे सीओ गौरव सिंह यांनी तपासाची स्थिती स्पष्ट केली. जवानाचे वडील राजा सिंह आणि त्यांचे दोन भाऊ रामनारायण सिंह आणि सुग्रीव सिंह यांचं चुरिया गावात वडिलोपार्जित घर आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी ग्राम पंचायतीच्या बैठकीत राजा सिंह आणि रामनारायण सिंह यांनी त्यांच्या हिश्श्याची जमीन तिसरा भाऊ सु्ग्रीव सिंह यांना विकण्याचा निर्णय घेतला. करारानुसार निश्चित झालेल्या रकमेपैकी जवान वीर बहादूर सिंह यांच्या बँक खात्यातही निम्मी रक्कम जमा करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, घर रिकामं केल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचा करार झाला होता. पण जवानाच्या वडिलांनी करार मानण्यास नकार देत आहेत. सध्या सुग्रीव सिंह जुनं घर पाडून नव्या घराची उभारणी करत आहेत. तर राजा सिंह पुढच्या खोलीत वास्तव्यास आहेत. याच वादातून २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मारहाणीची घटना घडली. त्या प्रकरणी लार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी दोन्ही बाजूंशी संवाद साधून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे.

