मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानं अनेक वाहनांची अवस्था बिकट झाली आहे. इथेनॉल मिसळूनही पेट्रोलचे दर कमी होत नाहीत. त्याउलट वाहनाचा मायलेज मात्र कमी होत आहे. सोबतच वाहनं वारंवार नादुरुस्त होत आहेत.
पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणानं कोट्यवधी ग्राहक मेटाकुटीला आलेले असताना आता डिझेलमध्ये १५ टक्क्यांपर्यंत आयसोब्युटेनॉल मिसळण्याची योजना तयार करण्यात आली आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
सरकारच्या पर्यायी इंधन धोरणाची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 'इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळू शकत नाही. त्यामुळे इथेनॉलपासून आयसोब्युटेनॉल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो,' असं गडकरी म्हणाले. 'इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नाही. त्यामुळे आम्ही आयसोब्युटेनॉल तयार करत आहोत. आयसोब्युटेनॉल डिझेलला पर्याय ठरू शकतो,' असं गडकरींनी सांगितलं.
डिझेलमध्ये १५ टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्यास परवानगी देण्याच्या दिशेनं काम करत आहे. यामुळे ऊर्जा क्षेत्रात देश आत्मनिर्भर होईल. स्वच्छ ऊर्जेच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं गडकरी म्हणाले. पायलट डेमोन्स्ट्रेशनमधून समोर आलेले निष्कर्ष उत्साह वाढवणारे आहेत. आम्ही १०० टक्के इथेनॉल आणि आयसोब्युटेनॉलवर दोन जनरेटर यशस्वीपणे चालवले. या इंधनांवर चालणारे इंजिन तयार केले जाऊ शकतात, ही बाब यातून सिद्ध झाली आहे.
आयसोब्युटेनॉलचे फायदे काय?
- आयसोब्युटेनॉल पुढील पिढीचं एक उत्तम बायोफ्यूल मानलं जातं.
- याची घनता अधिक असते.
- हे इंजिना सोबत जास्त उत्तमपणे काम करतं.
- अनेक पारंपारिक इंधनांच्या तुलनेत होणारं उत्सर्जन कमी असतं.
आयसोब्युटेनॉल मिश्रणामुळे भारताची खजिन तेल आयात कमी होईल. त्यामुळे आयातीवर होणारा खर्च घटेल. परकीय चलन वाचेल, असं अधिकाऱ्यांना वाटतं. पेट्रोलमध्ये होत असलेल्या इथेनॉल मिश्रणामुळे वाहनांचा मायलेज घटल्याच्या तक्रारी देशभरातून येत आहेत. पेट्रोलमध्ये होणाऱ्या इथेनॉल मिश्रणामुळे वाहनं वारंवार नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे कार चालकांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप भोगावा लागत आहे. यानंतर आता डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

