Dailyhunt
Dilip Prabhavalkar: मोठ्यांच्या गोष्टी

Dilip Prabhavalkar: मोठ्यांच्या गोष्टी

-दिलीप प्रभावळकरकधी कधी आपण कल्पना करतो, आपल्याला आवडणारी, आपल्यावर प्रभाव टाकणारी व्यक्ती प्रत्यक्षात कशी असेल? आपल्या मनातल्या (आपण चितारलेल्या) तिच्या प्रतिमेसारखीच? की वेगळीच?

मग अचानक 'दर्शन' होतं, आणि आपण ताडून पाहतो!

... मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला होता. अत्र्यांची अनेक सभा जिंकणारी आणि गाजवणारी भाषणं मी ऐकली होती. बहुतेक वेळा शिवाजी पार्कवर. हशा - प्रचंड हशा, टाळ्या - प्रचंड टाळ्या अशा शब्दांत 'मराठा' दैनिकात येणारं त्या सभांचं वर्णन मला पटायचं, कारण मी ते प्रत्यक्ष अनुभवलं होतं. अत्रेंचा आवाज, विरोधकांची भंबेरी उडवणारे विनोद, त्यांची शब्दांची आतषबाजी, भाषणांची शैली हे सारं ऐकलं, पाहिलं होतं. त्यांचा 'श्यामची आई' हा भारतातला पहिलं 'सुवर्णकमळ' मिळवणारा चित्रपट पाहिला होता. त्यांची नाटकं पाहिली होती. 'साष्टांग नमस्कार'पासून 'लग्नाची बेडी'पर्यंत आणि 'मोरूची मावशी'पासून 'तो मी नव्हेच'पर्यंत... कितीतरी. राजकीय सभांमधल्या त्यांच्या झंझावाती भाषणांबरोबरच त्यांची साहित्यविषयक व्याख्यानंही 'वसंत व्याख्यानमाला'मध्ये ऐकली होती. 'मराठी कविता', 'आपल्या साहित्यातील विनोदकार' असे काही विषय असायचे.

असे हे अफाट अत्रे त्यांच्या घरात प्रत्यक्षात कसे असतील, कसे दिसतील, कसे बोलतील असं त्यावेळी मनात यायचं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची काही कल्पना केली होती. 'अफाट'पणा त्यांच्यात प्रत्यक्षही दिसेल असं वाटत होतं. त्यांना एकदातरी प्रत्यक्ष पाहता, भेटता यावं असं वाटायचं.
अचानक तशी संधी एकदा मिळाली! आम्ही आमच्या हाऊसिंग कॉलनीतल्या गणेशोत्सवात अत्र्यांचं 'कवडी चुंबक' बसवलं. प्रयोगापूर्वी त्यांची परवानगी मागण्यासाठी (आणि त्यांना विचारून मानधन देण्यासाठी) त्यांच्या घरी जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचं ठरलं. खरं म्ह‌णजे, त्या परवानगीच्या निमित्तानं अत्र्यांना जवळून बघता येईल हेच कारण होतं.

त्यांचं घर आमच्या हाऊसिंग कॉलनीपासून जवळ होतं. चालत गेलो तरी वीसेक मिनिटांत पोहोचू असं. आम्ही चार मुलं त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या नोकराने पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या प्रशस्त दिवाणखान्यात आम्हाला नेलं. समोरच एका मोठ्ठ्या सोफ्यावर पायजमा आणि बिनबाह्यांचा बनियन घातलेले अवाढव्य अत्रे काळ्या फोनच्या डायलवर नंबर फिरवत होते. डोळ्यांवरचा चष्मा थोडा नाकावर घसरला होता. फोन लागल्यावर एका हाताने फोन कानाला लावून आणि दुसऱ्या हाताने फोनच्या केबलशी चाळा करीत, एखाद्या उघड्या मैदानावरच्या सभेत बोलावं तसं मोठ्या आवाजात ते बोलू लागले. समोर टीपॉयवर अर्धवट केलेल्या लेखनाचे कागद आणि उघडं पेन होतं. 'मराठा' दैनिकाचे अंक होते. 'उद्याचा अग्रलेख वाचा... कपडे उतरवलेत त्या हरामखोराचे... भंपक माणूस आहे -' असं ते बोलत होते. मी कल्पना केली होती, माझ्या मनात त्यांची प्रतिमा होती, अगदी तस्सेच मला ते वाटले.

परवानगीचं काम पटकन झालं. त्यांनी इंग्रजीत धावत्या अक्षरात नाटकाची अनुमती लिहून दिली. पंचवीस रुपये प्रयोगमूल्य घेतलं. खरं म्हणजे मला त्यांच्याकडे बघत, त्यांना ऐकत राहावं असं फार वाटत होतं. पण काम झाल्यावर रेंगाळणार कसं? ओरडले बिरडले तर? भीतीच वाटली. जाण्यासाठी वळत होतो तेवढ्यात आमच्यातला एकजण आगाऊपणे बोलला, 'आपण याल का आमच्या नाटकाला? छान बसलंय.' अत्रेंनी त्याच्याकडे चष्म्याच्या वरून बघितलं. 'ही कामं कोण करणार मग एवढी?' त्यांनी दिवाणखान्यातला जागोजागी वेड्यावाकड्या प्रकारे रचलेला पेपरांचा पसारा दाखवला. आम्ही मग निघालो.

अनेक वर्षांनंतर त्यांच्याकडे जाण्याचा योग पुन्हा आला होता. त्यांच्या 'झेंडूची फुले' या विडंबन कवितासंग्रहातल्या काही कवितांचं अभिवाचन - सादरीकरण मला करायचं होतं. मी त्यांना भेटायला उत्सुक होतो. पण ते आजारी होते. भेटणं झालं नाही. मग १९६९ साली ते गेलेच. असं त्यांचं 'दर्शन' एकदाच घडलं. मनातल्या प्रतिमेशी, कल्पना केलेल्या अफाट व्यक्तिमत्त्वाशी समोर पाहिलेल्या व्यक्तीचं रूप - बोलणं - वागणं तंतोतंत जुळलं!

पुलंच्या वेळी असंच झालं. माझ्या मनात, डोळ्यासमोर त्यांची प्रतिमा होती एका परफॉर्मरची. त्यांचं एवढं साहित्य (पुन्हा पुन्हा) वाचूनही त्यांच्या 'बटाट्याची चाळ', 'वाऱ्यावरची वरात' या कार्यक्रमांचा विलक्षण प्रभाव पडल्यामुळे आकाराला आलेली प्रतिमा... त्यांच्या भाषणांमुळे आणि विविध क्षेत्रांतल्या असामान्य चतुरस्र कामगिरीमुळे आणखी पक्की झालेली.

त्यांच्या 'बटाट्याची चाळ' या बहुरूपी कार्यक्रमाचा प्रभाव तर इतका होता की मला तो एक 'चमत्कार' वाटला. एक कलाकार तीन तास प्रेक्षकांना खिळवून कसा काय ठेवू शकतो याचं मला मोठं नवल वाटलं होतं. आपणही असं काही करायला हवं वाटण्याऐवजी, हेच करायला हवं असं वाटलं. आणि मी पुलंचा प्रयोग पुन्हा पुन्हा पाहून आणि 'बटाट्याची चाळ'मधले लेख वाचून त्यातला 'भ्रमण मंडळ' हा भाग चोख पाठांतर करून आमच्या हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात सादर केला. त्याचं कौतुक झालं. माझ्या अंगात उत्साह संचारला! मला वाटलं, आता कोणी सांगितलं, बोलावलं की करून दाखवायला हरकत नाही. 'दाभोळकर ऑप्टिशियन' आमच्या कॉलनीत राहायचे. त्यांच्या दुकानात जाऊन मी पुलंसारखा चष्माही करून घेतला. कॉलनीतल्याच एकदोघांनी मला त्यांच्या ऑफिसच्या वार्षिक समारंभाला हे सादर करायला बोलावलं. मग एकदा आमच्यासमोर राहणाऱ्या एका वकिलांनी मला विचारलं, 'काय रे तू पुलंना भेटलायस का?' 'नाही हो. फार इच्छा आहे. पण कसं जाणार?' 'मग हे त्यांचं भ्रमण मंडळ कसं करतोयस? परवानगी घेतली आहेस?' मला यासाठी परवानगी घ्यायची असते याची कल्पना नव्हती. 'सुनीताबाई केस करतील.' त्यांनी इशारा दिला. माझ्या उत्साहाला तात्काळ ब्रेक लागला. (मी चष्माही परत केला.)

पण मग पुलंची भेट झाली, (त्या वयात-) स्वप्नवत वाटणारं 'दर्शन' घडलं ते पक्कं आठवतं.
पार्ल्याच्या एका सभागृहात श्री. ना. पेंडसे लिखित 'राजेमास्तर' या नाटकाचा पुलंच्या हस्ते मुहूर्त होता. (दिग्दर्शक होते पुलंचेच कनिष्ठ बंधू रमाकांत देशपांडे. आणि कलाकार होते चंद्रकांत गोखले, सुमती गुप्ते, सुनीता देशपांडे, श्रीकांत मोघे) तिथे मला माझ्या बाबांचे मित्र घेऊन गेले. त्यांनी माझ्या संग्रहातली पुलंची पुस्तकं - तोपर्यंत प्रकाशित झालेली सगळीच्या सगळी पाहिली होतीच, शिवाय पुलंविषयी वर्तमानपत्रात आलेला मजकूर, त्यांची भाषणं या सगळ्याची मी व्यवस्थित कापून वह्यांमध्ये चिकटवलेली कात्रणंही पाहिली होती! (त्यांना ते 'वेड' बघून हसूच फुटलं होतं!) 'पुलंना भेटायचंय तुला? माझे मित्र आहेत ते.' असं त्यांनी म्हटल्यावर मला जवळजवळ हर्षवायूच झाला होता. 'राजेमास्तर'च्या मुहूर्ताच्या वेळी 'दर्शन' झालं! पुलंना पाहिल्याबरोबर वाटलं, आपल्यासमोर जी प्रतिमा होती, तसेच तर हे एरवीही दिसतात की! आनंदी, मिश्किल परफॉर्मर! मी पाहत राहिलो. त्यावेळी त्यांच्या अभिनयाच्या आणि संगीताच्या कर्तृत्वापेक्षा, वक्तृत्वापेक्षा त्यांचं साहित्यच आठवत राहिलं. परिच्छेदच्या परिच्छेद, वाक्यंच्या वाक्यं... विनोद - एकापाठोपाठ एक! कुडाळकरकाकांनी ओळख करून दिली. आता मला तो प्रसंग आठवला की वाटतं, त्यावेळच्या माझ्यात पुलंच्याच 'सखाराम गटणे' या पात्राची लक्षणं दिसत होती की काय? अर्थात मी 'कृत्रिम' किंवा 'छापील' बोलत नव्हतो. काही बोलतच नव्हतो. गप्प राहून हरवल्यासारखा उभा राहिलो होतो. कुडाळकरकाकाच पुलंना म्हणाले, 'बरं भाई, येतो आम्ही.' पुलंनीच माझा हात हातात घेऊन 'बरं भेटू या हं' म्हटलं.

त्यानंतर काही काळानं आम्ही बऱ्याचदा भेटलो. कामानिमित्त. तालमीत - प्रयोगांआधी - नाटकांच्या नंतर - त्यांच्या घरी - नाट्यगृहांमध्ये. त्या आठवणी आहेतच. पण पहिली 'दर्शना'ची आठवण खास आहे.

या मनातल्या प्रतिमेशी बरोबर जुळणाऱ्या व्यक्ती. पण असेही भेटले, जे कल्पनेतल्या रूपाला छेद देणारे होते. प्रत्यक्षातले अगदीच वेगळे. आश्चर्यच वाटावं, चकित व्हावं, अविश्वास वाटावा असे.
त्याबद्दल पुढच्या वेळी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims