वृत्तसंस्था, तिरुअनंतपुरम: केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी बुधवारी टाकलेल्या छाप्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) कार्यकर्त्यांनी तपासाधिकाऱ्यांवर हल्ले केले.
या हल्ल्यांसह माकप कार्यकर्त्यांनी तिरुअनंतपुरबरोबरच राज्यात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली.
'कोचीन मिनरल्स अँड रूटाइल लिमिटेड' या कंपनीने २०१८ ते २०१९ या कालावधीत विजयन यांची कन्या टी. वीणा यांच्या मालकीच्या 'एक्झालॉजिक सोल्युशन्स'ला १.७२ कोटी रुपये दिले. मात्र, त्या बदल्यात कोणतीही सेवा घेतली नसल्याच्या आरोपासंदर्भात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत (पीएमएलए) 'ईडी'कडून ही काराई करण्यात आली.
विजयन यांच्या 'बेकरी जंक्शन' येथील निवासस्थानात 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी पहाटे तपास सुरू केल्यापासून विजयन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य घरातच होते. दरम्यान, शेकडो कार्यकर्ते निवासस्थानाबाहेर जमले होते. त्यांनी यावेळी ईडी आणि भाजपप्रणीत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी तिथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हेल्मेट, प्लास्टिकच्या बाटल्या आणि दगड फेकले. काही कार्यकर्त्यांनी मुख्य दरवाजातून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याचे दूरचित्रवाणीवरील दृश्यांमध्ये दिसत होते.
'माकप'च्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या भाड्याच्या वाहनांना घेराव घालून त्यांचा मार्ग रोखला व किमान तीन गाड्यांवर दगड व विटा फेकल्या. त्यामुळे वाहनांच्या समोरच्या काचा, खिडक्या आणि आरसे फुटले. आंदोलकांनी वाहनांना लाथा मारल्या, त्यांच्या खिडक्या व समोरच्या काचांवर काठ्यांनी प्रहार केले. तसेच त्यांच्यावर सडलेली अंडीही भिरकावल्याचे सांगण्यात आले. यावेळी वाहनामध्ये एक महिला अधिकाऱ्यासह सहा अधिकारी होते. या हिंसाचारात वाहनांच्या चालकांपैकी एकाला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. या हिंसक जमावाला रोखण्यात पोलिसांना अपयश आले. या घटनेनंतर 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी थंपानूर पोलिस ठाण्यात जाऊन आंदोलकांविरुद्ध तक्रार दाखल केली.
'ईडी'चे छापे राजकीय हेतूने प्रेरित'
नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री विजयन आणि इतरांच्या निवासस्थानी 'ईडी'ने टाकलेले छापे हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी केला. ही कारवाई म्हणजे अत्यंत 'घृणास्पद हल्ला' असल्याची टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनीही 'कोचीन मिनरल्स अँड रूटाइल लिमिटेड'कडून पैसे घेतले असल्याचा दावा करत, त्यांचीही चौकशी करण्याची मागणी बेबी यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केली.
'माकप-भाजप भागीदारी का तुटली?'
तिरुअनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्यातील बैठकीनंतर पिनराई विजयन यांच्या निवासस्थानांवर 'ईडी'ने छापे टाकले. ही काँग्रेस-भाजपची एकत्रित कारवाई असल्याचा आरोप माकपने केला होता. राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी तो स्पष्टपणे फेटाळून लावला. 'माकप व भाजप यांच्यातील 'भागीदारी' तुटल्यानेच 'ईडी'ने कारवाई केली. ही भागीदारी का तुटली, याचे स्पष्टीकरण माकपने द्यावे', असे ते यावेळी म्हणाले.
'ईडी'ची ही झाडाझडती देशभरातील विरोधी पक्षनेत्यांवर हेतूपुरस्सर केल्या जाणाऱ्या कारवाईचा एक भाग आहे. अशा कृत्यांमुळे आम्हाला घाबरवता किंवा कमकुवत करता येईल, असा भ्रम कोणीही बाळगू नये. - पिनराई विजयन, माजी मुख्यमंत्री, केरळ

