म. टा. प्रतिनिधी, पुणे: 'ई २०' (इथेनॉल-मिश्रित इंधन) यामुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड होत असल्याचे कोणतेही चित्र दिसत नाही,' असे स्पष्टोक्ती 'दि ऑटोमोटिव्ह रिसर्च एसोसिएशन ऑफ इंडिया'चे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी केली.
वाहन उत्पादक कंपन्यांच्या अधिकृत सेवा केंद्रांमध्ये 'ई २०'मुळे उद्भवलेल्या गंभीर तक्रारींचा मोठा ओघ दिसत नाही. जर एखाद्या वाहनात समस्या जाणवत असेल; तर ग्राहकांनी थेट अधिकृत विक्रेत्याकडे (डीलर) जाऊन वाहनाची तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.
ऑटोमोटिव्ह इंधन म्हणून 'ई २०' (इथेनॉल-मिश्रित इंधन) बाबतची अद्ययावत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मथाई बोलत होते. ते म्हणाले, 'इथेनॉलचा वापर करण्यापूर्वी त्याबाबतच्या आवश्यक त्या चाचणी आणि अभ्यास पूर्ण करण्यात आले आहेत. संबंधित चाचण्यांमध्ये आठ ते दहा वर्षाच्या जुन्या दुचाकी, चारचाकी वाहनासह नवीन बीएस ४ वाहनांचीही तपासणी करण्यात आली. वेगवेगळ्या ४० ते ५० हजार किलोमीटर अंतराची चाचणी करून त्याचे निकाल पाहून त्याचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.'
'इथेनॉलचा वापर करीत असताना त्यामुळे वाहनांच्या मायलेजवर दोन ते सहा टक्क्यांपर्यंत परिणाम होत असतो. मात्र, त्याचा कोणताही विपरीत परिणाम वाहनांच्या कार्यक्षमतेवर होत नाही. उत्पादकांनीही जे आवश्यक बदल वाहनात हवे आहेत, त्याबाबतची खबरदारी घेतली, त्यामुळे नवीन वाहनांवर याबाबत परिणाम दिसून येत नाही. जी जुनी वाहने आहेत. त्यांची क्षमता वेगळी असल्याने त्याबाबतच्या तक्रारी काहीजण समाजमाध्यमांवर टाकत आहे. मात्र, वाहनांचे जे डीलर आहेत त्यांच्याकडे कोणत्याही तक्रारी दिल्या जात नाहीत,' असेही डॉ. मथाई म्हणाले.
दरम्यान, 'वाहनांचा वापर आपण कशाप्रकारे करतो यावरही वाहनांचा मायलेज अवलंबून असतो. इथेनॉलचा वापर वाहनांमध्ये २५ टक्के करीत असताना त्याबाबत आवश्यक ती तयारीदेखील गरजेची असते. त्यादृष्टीने अभ्यास करून बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. युद्धजन्य परिस्थितीत इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याने; तसेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आपण आयात करीत असल्याने देशांतर्गत बायो इथेनॉल वापरणे महत्त्वाचे आहे. वाहनांमध्ये 'इथेनॉल कन्वर्जन कीट'ची परवानगी अद्याप सरकारने दिलेली नाही. त्यामुळे ग्राहकांनीही नियमाशिवाय संबंधित किटचा वापर करू नये. वाहनांच्या उत्सर्जनाच्या चाचणीसाठी भारत एक एप्रिल २०२७ पासून 'वर्ल्डवाइड हार्मोनाइज्ड लाइट व्हेइकल टेस्ट प्रोसिजर' ही जागतिक कार्यपद्धती स्वीकारणार आहे', असेही डॉ. मथाई यांनी स्पष्ट केले.

