Best Investment Schemes: तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील आणि चांगला परतावा मिळवायचा असेल, तर सरकारी बचत योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. आजही आपल्यापैकी बरेच लोक आपल्या कमाईवर आकर्षक परतावा मिळवण्याच्या उद्देशाने बँकेत एफडी किंवा मुदत ठेवीत गुंतवणूक करतात पण, गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात केल्यापासून मुदत ठेवींचा दरही कमी झाला आहे.
अशा परिस्थितीत, सरकारी योजना एक फायदेशीर पर्याय म्हणून उदयास येत आहेत. सरकार-समर्थिक काही योजनांमध्ये 7.5% ते 8.2% पर्यंत वार्षिक व्याज मिळत असून यामुळे या योजना सामान्य गुंतवणूकदारांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. या योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे की यामध्ये तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला कर सवलतीचा लाभही मिळतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या SCSS योजनेत सध्या वार्षिक 8.2% व्याज दिला जात असून यामध्ये 1000 ते 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या स्कीममधील गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षाचा आहे जो आणखी तीन वर्षांपासून वाढवला जाऊ शकतो. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
सुकन्या समृद्धी योजना
SSY ही अल्पवयीन मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी उत्तम पर्याय आहे, ज्यामध्ये सध्या 8.2% व्याज दिला जात आहे. किमान 250 आणि कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही गुंतवणूक कर-सवलतीस पात्र आहे आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त असते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
तुम्हाला ठराविक कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे NSC एक चांगला पर्याय आहे.यावर वार्षिक 7.7% व्याजदर निश्चित केला असून पाच वर्षांपासून यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. फक्त 1000 रुपयांपासून या स्कीममध्ये गुंतवणूक सुरू करता येते आणि कोणतीही कमाल मर्यादा नाही.
किसान विकास पत्र
किसान विकास पत्रद्वारे तुमचे पैसे अंदाजे 115 महिन्यांत (अंदाजे 9 वर्षे आणि 5 महिन्यांत) दुप्पट होऊ शकतात. या योजनेतील तुमच्या जमा ठेवीवर 7.5% व्याज मिळते आणि गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही.
आरबीआय फ्लोटिंग रेट बॉण्ड्स
याव्यतिरिक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फ्लोटिंग रेट बॉण्ड्स देखील एक सुरक्षित पर्याय आहे, ज्यामध्ये सध्या 8.05% व्याज दिला जात आहे. या स्कीमचा कालावधी सात वर्षांचा असून गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही.
लक्षात घ्या की वर नमूद सर्व योजना सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला परतावा देतात, पण प्रत्येक योजनेच्या अटी आणि कालावधी वेगवेगळे आहेत. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गरजा आणि उद्दिष्टे समजून घेणे महत्त्वाचे आहे. योग्य योजना निवडून, तुम्ही कोणताही धोका न पत्करता पैशातून पैसा उभा करू शकता.

