Dailyhunt
Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसणार... निवडणूक झाली आता कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार

Fuel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसणार... निवडणूक झाली आता कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार

Fuel Price Hike Update: गेल्या काही दिवसांपासून महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला लवकरच आणखी एक 'करंट' बसणार आहे. मागील काही दिवसांच्या अट्कळानंतर सरकारी तेल कंपन्या म्हणजे OMCs येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार

होर्मूझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे तेलाचा पुरवठा खंडित झाला असून परिणामी इंधन उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत विकल्यामुळे होणारा तोटा भरून करण्यासाठी इंधन दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. अशाप्रकारे, गेल्या चार वर्षांपासून 'जैसे थे' ठेवलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरात अखेर बदल दिसून येईल. पश्चिम आशियात तणाव सुरू झाल्यापासून ब्रेंट क्रूडच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या असून आता भारतात किमती 4 रुपयेपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

मनीकंट्रोलने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, "तेल कंपन्यांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या विक्रीत तोटा होत असून पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहेत. दरवाढीबाबत चर्चा सुरू आहे."


याआधी मार्च महिन्यात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हणलेले की, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 च्या पुढे गेल्या असूनही किरकोळ किमतींमध्ये कोणताही बदल झाला नसल्यामुळे ओएमसींना पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे 24 रुपये तर डिझेलवर 30 रुपये नुकसान सहन करावे लागत आहे.

2 ते 4 रुपयांची संभाव्य वाढ

त्याचवेळी आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "जेव्हा प्रत्यक्ष पुरवठा मर्यादित होतो, तेव्हा किमती कृत्रिमरित्या अनिश्चित काळासाठी स्थिर ठेवता येत नाहीत. किमतींचे संकेत कोणत्यातरी टप्प्यावर प्रभावी ठरायलाच हवेत."

"मी दरवाढीची शक्यता नाकारणार नाही. खरं तर, वाढत्या खर्चाच्या दबावामुळे डिझेलच्या किमती अद्याप का वाढवण्यात आल्या नाहीत, याचे उद्योगात आश्चर्य व्यक्त केले जात आहे," असे अधिकाऱ्याने म्हणत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर 2 ते 4 रुपये वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.


इराण आणि अमेरिकेने आतापर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी रोखून धरल्यामुळे निर्माण झालेल्या जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यांतील अनेक अहवालांमध्येकच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ इंधन दरात वाढ होण्यास सूचित केले होते. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याची कोणतीही तात्काळ योजना नसल्याचे सांगत सरकारने असे दावे सातत्याने फेटाळून लावले.

अशा परिस्थितीत, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यावर आता इंधन दरवाढीबद्दल सरकारच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष लागून असेल.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims