Gold Price Today Update: गेल्या काही दिवसांत विक्रमी नीचांकीवर घसरलेल्या सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजीचा कल पाहायला मिळत आहे. फेडरल रिझर्व्हचे नवनियुक्त अध्यक्ष केविन वॉर्श यांनी व्याजदरात मोठी वाढ अपेक्षित नसल्याचे विधान केल्यानंतर सोन्याच्या दरात तेजीची लाट उसळली आहे.
अशाप्रकारे, सलग दुसऱ्या दिवशी घसरत्या सोन्याच्या दराने पुन्हा उभारी घेतली, तर चांदीची किंमतही जोरदार वाढली आहे.
याआधी मध्यपूर्वेतील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढीसह जगभर महागाईचा भडका उडालेला. तसेच ऊर्जा पुरवठाही खंडित झाल्यामुळे व्याजदर वाढीच्या भीतीमुळे जून तिमाहीत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती, पण फेड अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात तेजी कायम राहिली.
सोने आणि चांदीचा आजचा दर काय
सकारात्मक जागतिक संकेत आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून आक्रमक व्याजदर वाढीच्या अपेक्षा कमी झाल्यामुळे देश-विदेशातील मौल्यवान धातूंना पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. परिणामी शुक्रवार, 3 जुलै रोजी सकाळी MCX वर सोने आणि चांदीच्या किमती 2% पर्यंत उसळी घेऊन व्यवहार करत आहेत.देशांतर्गत बाजारात, MCX वर, सकाळी 9.22 वाजता सोन्याचे ऑगस्ट फ्युचर्स 1.35 टक्के किंवा 1900 रुपयांनी वाढून 1,47,737 रुपयांवर व्यवहारत होते, तर चांदीच्या किमतीतही 1.64% टक्के म्हणजे 3,700 रुपयांची वाढ झाली आणि भाव 2,32,995 रुपये किलोवर पोहोचला.
दुसरीकडे, अमेरिकी बाजारातही सोन्याची किंमत 1 टक्क्यांनी वाढली आणि पाच आठवड्यातील घसरणीनंतर पहिल्यांदाच पहिल्या साप्ताहिक वाढीच्या दिशेने कूच करत आहे. अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा कमी रोजगारविषयक आकडेवारीमुळे फेड रिझर्व्ह व्याज दरवाढ पुढे ढकलण्याची अपेक्षा वाढली, ज्यामुळे गुंतवणूकदारन्स जोखीम घेण्याची ताकद वाढली.
या दरम्यान, डॉलर निर्देशांकही आठवड्याभरात सुमारे अर्ध्या टक्क्याने घसरला, त्यामुळे इतर चलनांत सोने स्वस्त झाले. याशिवाय भू-राजकीय आघाडीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील अप्रत्यक्ष वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत, मात्र वादाचा मुख्य मुद्दा (अणुशस्त्रे) यावर अद्यापही तोडगा निघलेला नाही.
सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच
गुंतवणूकदारांनी पैसे काढायला सुरुवात केली परिणामी, जून महिन्याच्या अखेरीस दरांमध्ये घसरण झाली. जानेवारी महिन्याच्या अखेरीस उच्चांकी शिखरावर उंच झेप घेतलेल्या सोन्याच्या दरात जून तिमाहीत 12% हून अधिक घसरण झाली, आणि याच काळात चांदीचा भावही 17 टक्क्यांनी घसरला. अशाप्रारे, देशांतर्गत बाजारात जानेवारीमध्ये 1.90 लाख रुपयांवर उच्चांकी झेप घेतलेल्या सोन्याचा भाव 1.39 लाख रुपयांपर्यंत घसरलेला.(Disclaimer : सोने आणि चांदीमधील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. तुम्हाला कोणत्याही प्रकारे गुंतवणूक करायची असल्यास सर्वप्रथम आर्थिक तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.)

