Gold Import: सोन्याच्या दरात गेल्या वर्षभरात प्रचंड वाढ झाली आणि 'गोल्डन टच' जवळपास दुपटीने महागले आहे. पण असं असूनही भारताने सोन्याची प्रचंड खरेदी केली आहे. जागतिक किमतींमधील चढ-उतार, देशांतर्गत मागणी, लग्नसराई आणि अक्षय तृतीयेसारख्या सणांमुळे आयातीला चालना मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे.
सोन्याची आयात वाढली
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मौल्यवान धातूंच्या वाढलेल्या किमतींमुळे एप्रिल-फेब्रुवारी 2025-26 मध्ये भारताची सोन्याची आयात 28.73% वाढून 69 अब्ज डॉलर म्हणजे तब्बल अंदाजे 6.5 लाख कोटी रुपये झाली आहे. त्याचवेळी, सोन्याच्या आयातीतील या वाढीमुळे देशाची व्यापार तूट (आयात आणि निर्यातीमधील फरक) मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील 261.80 अब्ज डॉलरवरून वाढून 310.60 अब्ज डॉलर झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच सोन्याच्या किमती वाढूनही भारताची आयात वाढत आहे.भारतानं कुठून खरेदी केलं सर्वाधिक सोनं
भारताने एकूण सोन्याच्या आयातींपैकी स्वित्झर्लंडकडून जवळपास 40% खरेदी केली आहे. त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिराती (16% हून अधिक) आणि दक्षिण आफ्रिका (सुमारे 10%) यांचा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण आयातीत सोन्याचा वाटा 5% हून अधिक असून एप्रिल-फेब्रुवारी 2025-26 दरम्यान स्वित्झर्लंडमधून एकूण आयात 11.57% वाढून 23.5 अब्ज डॉलर झाली. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात स्वित्झर्लंडमधून होणारी सोन्याची आयात 2.71 अब्ज डॉलरवर पोहोचली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 719.30% जास्त आहे.
जगात सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक देश कोण?
चीननंतर भारत जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक असून प्रामुख्याने दागिन्यांच्या उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी ही आयात केली जाते.वाढत्या सोन्याच्या आयातीचा भारताच्या चालू खात्यातील तुटीवर थेट परिणाम होत असून दागिन्यांच्या उद्योगाव्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेनेही गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले.
जागतिक पातळीवरील सध्याच्या अस्थिरतेला तोंड देण्यासाठी मध्यवर्ती बँका आपला सोन्याचा साठा वाढवत असताना रिझर्व्ह बँकेनेही खरेदीच्या लाइनमध्ये उडी घेतली ज्यामुळे एकूण आयातीत लक्षणीय भर पडली.
रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत किती सोनं?
मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीतील सोन्याचा साठा अंदाजे 880 टनांवर पोहोचला आहे ज्याचे एकूण मूल्य 100 अब्ज डॉलर्सच्या वर उसळले आहे. रिझर्व्ह बँकेच्या साठ्यातील एकूण सोन्यापैकी अंदाजे 512 टन सोने भारतात ठेवले आहे, तर 348.62 टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सकडे सुरक्षित आहे.
