Gold Silver Prices: सोने आणि चांदीच्या भावात गेल्या दोन महिन्यांपासून चढ-उतार सुरूच आहेत त्यामुळे ग्राहकांपासून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती घसरल्या होत्या, पण आता पुन्हा त्यात किंचित वाढ दिसून येत आहे.फेडरल रिझर्व्हचे व्याज दरांसंबंधी धोरण, वाढती महागाई आणि अमेरिका व इराणमधील तणाव यामागील मुख्य कारणे आहेत.
सोने-चांदीचे आजचे दर काय
शुक्रवार, 1 मे 2026 रोजी, आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजार (कॉमेक्स) वर सोने आणि चांदीचे भाव स्थिर राहिले आहेत. मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे कमोडिटी बाजारावर दबाव असून वाढत्या भू-राजकीय तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे भारतातील सोन्याच्या आयातीतही मोठी घट झाली. सोने आणि चांदीच्या किमतीतील घसरणीमुळे गुंतवणूकदार नाराज झाले आहेत, तर सामान्य खरेदीदार आनंदी झाले आहेत.
कॉमेक्सवर स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस $4,640.50 आणि स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस $74.930 पर्यंत घसरला. त्याचवेळी, गुरुवारी, भारतीय कमोडिटी मार्केट एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,51,225 रुपये आणि चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 2,44,648 रुपयांवर बंद झाला.
सोन्यात गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती?
जेव्हा व्याजदर जास्त असतात, तेव्हा लोक सोन्यामध्ये कमी गुंतवणूक करतात, पण जागतिक तणाव किंवा महागाई वाढते, तेव्हा लोक सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून पुन्हा खरेदी करू लागतात. यामुळेच किमती वारंवार बदलत आहेत. उद्योगांमध्ये वापर झपाट्याने वाढत असल्यामुळे चांदीच्या किमतीही वाढत आहेत. अशा परिस्थितीत, सध्या तज्ज्ञ अशा काळात घाईघाईने खरेदी-विक्री न करण्याचा आणि विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.
मध्यवर्ती बँकांची व्याजदरात कपात लांबली
फेड रिझर्व्ह बँकेच्या पाठोपाठ बँक ऑफ जपान, युरोपियन सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंड यांनीही व्याजदर ठेवले आहेत. मध्य-पूर्वेतील तणावामुळे बाजारांना व्याजदर स्थिर राहण्याची अपेक्षा होती. इतकेच नव्हे तर अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी अमेरिकेची मध्यवर्ती बँक 2026 मध्ये दोनदा व्याजदरात कपात करण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता ब्रोकरेज कंपन्या या अंदाजांवरून माघार घेण्याची तयारी करत आहेत.

