मुंबई : आयपीएल २०२६ मधील दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स संघाने जिंकला. या सामन्यामध्ये राजस्थान संघावर सात विकेटने मात करत सामना जिंकला. या विजयासह गुजरात संघाने तिसऱ्यांदा फायनल गाठली आहे.
या सामन्यामध्ये कॅप्टन शुभमन गिल याने १०४ धावांची शतकी खेळी केली. आयपीएलमधील शुभमनचे हे पाचवे शतक होते तर प्ले ऑफमधील सामन्यात आतापर्यंतचे सर्वात वेगवान (४७ चेंडूत) शतक ठरले. राजस्थान संघाने दिलेल्या २१५ धावांचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाने १९ ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर लक्ष्य पूर्ण केले. या सामन्यामध्ये राजस्थानचा हुकमी एक्का असेल्या वैभव सूर्यवंशी याची ९६ धावांची खेळी व्यर्थ ठरली. पण हा सीझन वैभव सूर्यवंशीमुळे सर्वांच्या लक्षात राहिल. सामना संपल्यावर कॅप्टन गिलने प्रतिक्रिया देताना मला वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे.
शुभमन गिल काय म्हणाला?
आजच्या सामन्यामध्येही साई सुदर्शन पुन्हा हिट विकेट झाला. यावेळी सुद्धा चेंडू सीमारेषेच्या पार गेला पण त्याच्या बॅटने बेल्स पडल्या. यावर बोलताना, मी असं कधी पाहिलं नव्हतो, सलग दोन सामन्यांमध्ये तो अशा पद्धतीने आऊट झाला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये मी त्याच्या हातांना सेलोटेपने बांधलं आहे. आता मला फायनलच्या सामन्यामध्ये असंच काहीतरी करावं लागणार आहे, असं गिल मिश्किलपणे बोलला.
दरम्यान, राजस्थानच्या लक्ष्याच्या पाठलाग करण्यासाठी गुजरातला पॉवर प्ले मध्ये विकेट गमवून न देता धावा काढायच्या होत्या. सुदर्शन आणि गिल या दोघांनी ७७ चेंडूत १६७ धावांची खेळी केली होती. राजस्थानच्या पराभवाला हीच कारणीभूत ठरली. यामध्ये साई सुदर्शन याला १४ धावांवरचे मिळालेले जीवनदान वगळता दोघांनी आरआरच्या गोलंदाजांवर आपले वर्चस्व गाजवले.

