Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gujarat ATS Big Action: गुजरातमध्ये 1150 कोटींचे कोकेन जप्त; ATS व तटरक्षक दलाची मोठी कारवाई

Gujarat ATS Big Action: गुजरातमध्ये 1150 कोटींचे कोकेन जप्त; ATS व तटरक्षक दलाची मोठी कारवाई

वृत्तसंस्था, अहमदाबाद: अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त करताना गुजरात एटीएस (दहशतवादविरोधी पथक) व भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या मुंद्रा बंदरावरून मंगळवारी पहाटे तब्बल १,१५० कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले.

११५ किलो वजनाचे हे कोकेन एका जहाजातून हस्तगत करण्यात आले. या कारवाई अंतर्गत तीन विदेशी नागरिकांनादेखील ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

मेक्सिको येथून निघालेल्या युरोप नावाच्या या जहाजाने कराची येथून मार्गक्रमण करत कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ नांगर टाकला होता. 'ब्राझिल येथून सागरीमार्गे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणले जात आहेत, अशी गोपनीय माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली', असे गुजरातचे पोलिस महासंचालक केएलएन राव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. 'हे अमली पदार्थ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्राझिल येथे या जहाजावर चढवण्यात आले व ते मोटर कक्षात दडवण्यात आले होते', अशी कबुली ताब्यात घेतलेल्या एका आरोपीने दिली. विशेष म्हणजे, जहाजावरील कर्मचाऱ्यांना याविषयी माहिती नव्हती, असेही एटीएसतर्फे सांगण्यात आले.

या जहाजावरून जुमा नासिर ओमर या टान्झानियाच्या नागरिकास अटक करण्यात आली व त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे नवी दिल्लीतील द्वारका येथून अन्य दोन विदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघे जण हे अमली पदार्थ स्वीकारण्याच्या तयारीत होते. केल्विन चकवुआमा आणि बॅरंज जेम्स अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे अनुक्रमे नायजेरिया व युगांडाचे नागरिक आहेत.

पोती समुद्रातून हस्तगत
या कारवाईची चाहूल लागताच आरोपींनी सहा पोती समुद्रात टाकल्या. मात्र कमी दृश्यमानता असूनही त्यातील पाच पोती हस्तगत करण्यात अधिकाऱ्यांना यश आले. या पोत्यांमध्ये एकूण ११५ पाकिटे होती व प्रत्येक पाकिटाचे वजन सुमारे एक किलो होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims