Dailyhunt
हनी सिंग आणि बादशाहला दिल्ली हाय कोर्टाचा दणका, महिलांचा अपमान करणारं 'Volume 1' गाणं काढून टाकण्याचे आदेश

हनी सिंग आणि बादशाहला दिल्ली हाय कोर्टाचा दणका, महिलांचा अपमान करणारं 'Volume 1' गाणं काढून टाकण्याचे आदेश

मुंबई - दिल्ली उच्च न्यायालयानं गुरुवारी रॅपर हनी सिंग आणि बादशाह यांना मोठा धक्का दिला. न्यायालयानं त्यांचं २००० च्या दशकातील वादग्रस्त गाणं 'माफिया मुंडीर व्हॉल्यूम १' सर्व प्लॅटफॉर्मवरून तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

इतकंचं नाही, तर उच्च न्यायालयानं हे गाणं अत्यंत अश्लील आणि असभ्य, महिलांचा अपमान करणारं असल्याचं म्हटलं आहे.

हिंदू शक्ती दलानं गाण्याविरोधात याचिका दाखल केलेली

युट्यूब, गूगल आणि स्पॉटिफाय यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गाण्याचा व्हिडिओ आणि ऑडिओ काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या हिंदू शक्ती दलानं दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय सुनावणी केली आहे. याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला होता की, अलीकडील एका कॉन्सर्टमध्ये हनी सिंगनं गाण्याच्या काही ओळी गायल्या होत्या, ज्यामुळे हे गाणं त्यानंच गायले आहे हे सिद्ध होतं.


गाणं ऐकल्यानंतर आणि त्याचे बोल वाचल्यानंतर, न्यायमूर्ती पुरुषेंद्र कौरव यांनी सांगितलं की, न्यायालयाच्या सद्सद्विवेकबुद्धीला खोलवर धक्का देणाऱ्या अत्यंत दुर्मिळ प्रकरणांपैकी हे एक आहे. ही एक दुर्दैवी घटना आहे. कारण गाण्याचे बोल महिलांप्रति अपमानकारक आहेत, असं न्यायालयाने सांगितलं.

न्यायाधीशांनी तीव्र शब्दांत टीका करत म्हटलं की, कलात्मक अभिव्यक्ती किंवा भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली, अल्पवयीन मुलांसह सर्व वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध असलेल्या सार्वजनिक माध्यमांवर अशा आशयाचा प्रसार करणं पूर्णपणे अस्वीकार्य आहे.

हनी सिंग आणि बादशाह यांना न्यायालयाची नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयानं हनी सिंग आणि बादशाह यांनाही नोटीस पाठवली असून, गाणी असलेल्या यूआरएल (URLs) तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. इतकंच नव्हे तर, न्यायालयानं याचिकाकर्त्याला वादग्रस्त गाणं असलेल्या इतर लिंक्सची (रिमिक्ससह) यादी तयार करून ती केंद्र सरकारकडे सादर करण्याची मुभा दिली आहे, जेणेकरून सरकार ऑनलाइन प्लॅटफॉर्मना त्या लिंक्स काढून टाकण्याचे निर्देश देऊ शकेल. पुढे, या प्रकरणाची सुनावणी आता ७ मे रोजी होईल, असं न्यायालयानं सांगितलं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims