म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असून, खालपासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. पोलिसांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही.
म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरू आहे. हातभट्ट्या व विषारी दारूने थैमान घातले आहे.
राज्याचा गृह विभाग 'पांडू हवालदार' चालवत असल्यामुळेच सगळीकडे बेबंदशाही माजली आहे,' अशी टीका करून 'देवेंद्र फडणवीस यांनी याचे प्रायश्चित घेऊन राज्याला पूर्ण वेळ सक्षम गृहमंत्री द्यावा,' अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 'पुण्यात विषारी दारूने २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारला जाग आली असून, हातभट्ट्या तोडण्याची कारवाई केली जात आहे. या हातभट्ट्या एका रात्रीत उभ्या राहिलेल्या नाहीत. राज्यातील अनेक शहरांत व खेड्यांत अवैध धंदे व हातभट्ट्या राजरोस सुरू आहेत.
'आरक्षणासाठी जातगणना करावी'
'मराठा आंदोलनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत मध्यरात्री मराठा आरक्षण दिल्याचे जाहीर केले व गुलाल उधळला होता. त्यानंतर आझाद मैदानातील आंदोलनावेळीही गुलाल उधळला. त्या वेळी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस होते. या दोन्ही आंदोलनांवेळी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते ते जाहीर करावे. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर जातनिहाय जनगणना करावी. त्यातूनच मराठा समाजासह सर्वच समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो,' असेही सपकाळ म्हणाले.
'गुन्हेगारीत पुणे देशात पाचवे'
गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे राज्यात पहिल्या आणि देशात पाचव्या क्रमांकावर आल्याने पुणे गुन्हेगारीची राजधानी बनले आहे. याला 'पुण्याचे शिल्पकार'च जबाबदार आहेत,' अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. विषारी दारूकांडातील मृत्यूंची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. हे आकडे लपवले जात असल्याचा संशय व्यक्त करीत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी त्यांनी केली.

