Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हवाई इंधनाच्या कडाडलेल्या दरामुळे Air Indiaचा महत्त्वाचा निर्णय; उड्डाणांमध्ये २२ टक्क्यांची कपात, परिणाम कुठे?

हवाई इंधनाच्या कडाडलेल्या दरामुळे Air Indiaचा महत्त्वाचा निर्णय; उड्डाणांमध्ये २२ टक्क्यांची कपात, परिणाम कुठे?

.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: इराण युद्धामुळे हवाई इंधनाच्या (एअर टर्बाइन फ्युएल - एटीएफ) कडाडलेल्या दरामुळे वाढलेल्या उड्डाण खर्चाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने जून ते ऑगस्ट या कालावधीत देशांतर्गत विमानोड्डाणांमध्ये २२ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.

त्यामुळे यंदाच्या मोसमात विमानसेवांच्या गोंधळामुळे देशांतर्गत प्रवासाला प्राधान्य दिलेल्या अनेक पर्यटकांसमोर विमान रद्द झाले तर परतण्याचा पर्याय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एअर इंडियाने अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवांध्ये कपात केली होती.

७९० हून अधिक उड्डाणांना फटका

आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये केलेल्या बदलाच्या आधारे देशांतर्गत सेवांमध्ये बदल केल्याचे एअर इंडियाने निवेदनात स्पष्ट केले. हे बदल तात्पुरते असून काही निवडक मार्गांवरील वारंवारता कमी केल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, २२ टक्के उड्डाण कपातीमुळे दर आठवड्याला सुमारे ७९० हून अधिक उड्डाणे कमी होतील असा अंदाज आहे. एकूण हवाई परिचालनावर उच्च इंधनदराच्या सततच्या प्रभावामुळे ही कपात करणे गरजेचे असून परिस्थिती स्थिर होताच उड्डाणांची वारंवारता पूर्ववत करण्याच्या दृष्टीने एअर इंडिया प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच या बदलांमुळे परिणाम होणाऱ्या प्रवाशांना पर्यायी उड्डाणांवर विनामूल्य तारिख बदल किंवा लागू असल्यास संपूर्ण परतावा देण्यासाठी सक्रियपणे मदत केली जाईल, असेही कंपनीने सांगितले. तसेच राहण्याची पुन्हा व्यवस्था करून देण्यासाठीही एअर इंडियातर्फे मदत करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.

काही पर्यटन व्यावसायिकांच्या मते आंतरराष्ट्रीय विमानांना जोडणारी विमाने कमी केल्याने प्रवाशांना याचा फारसा फटका बसणार नाही. ही विमाने आंतरराष्ट्रीय मार्गावरून आलेल्या प्रवाशांना देशांतर्गत शहरांशी जोडणारी फीडर विमाने आहेत. यामध्ये बहुतांश प्रवासी हे आंतरराष्ट्रीय मार्गावरून आलेले असतात. मूळ आंतरराष्ट्रीय विमानेच सध्या रद्द झाल्याने देशांतर्गत प्रवाशांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक अमर ऐनापुरे यांनी दिली. या प्रवाशांना नंतरच्या विमानात सामावून घेतले जाईल. तसेच सध्या देशांतर्गत प्रवासी खूप नसल्याने इतर विमानसेवाही पूर्ण क्षमतेने वापरल्या जात नसल्याचे दिसते. त्यामुळे विमानात जागा शिल्लक असल्याने मागणी कमी असल्याने ही तिकिटे आयत्या वेळी फारशी चढ्या भावाने विकली जाणार नाहीत असाही अंदाज त्यांनी वर्तवला. या कपातीकडे इंधन बचतीचा पर्याय म्हणून पाहण्याचा मुद्दाही या निमित्ताने समोर आला आहे.

इंधनाची बचत होणार

विमानांचे योग्य नियोजन झाल्यास विमान इंधनामध्येही देशांतर्गत मार्गांमधील बदलांमुळे बचत होऊ शकते, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. 'अनेकदा विमान कंपन्यांसाठी प्रवासी महत्त्वाचे नसतात आणि त्यामुळे प्रवाशांना सुविधा दिल्या जातीलच याची खात्री नसते. एअर इंडियाने इतर विमानकंपन्यांशी सहकार्याने अशा अडकलेल्या प्रवाशांची सोय करणे अपेक्षित आहे. सुट्टीचा कालावधी संपत असताना, शाळा सुरू होत असताना किंवा दुसऱ्या दिवशी कार्यालयीन वेळ गाठण्याची विवंचना असताना अशी विमाने रद्द झाल्यास त्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे. यंदा प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास टाळून देशांतर्गत प्रवासाचा अधिक विचार केला होता. आयत्या वेळी रद्द झालेल्या विमानांमुळे त्यांना दुसऱ्या विमानसेवेचा विचार करायला लागला तर कुटुंबाचा एकूण खर्च विचारात घेता खिशावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे', असे पर्यटन व्यावसायिक राजेश रतेरिया यांनी सांगितले.

परिणाम काय ?

काही ठरावीक मार्गांवर ही कपात करण्यात आल्याचे एअर इंडियाने जाहीर केलेले असले तरी ट्रॅव्हल एजंटकडे आलेल्या यादीनुसार काही मार्गांवर आठवड्यातील सहा दिवस एखादी सेवा रद्द झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुंबई-जयपूर, जयपूर-मुंबई, दिल्ली-नागपूर, मुंबई-हैदराबाद, गोवा-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-भोपाळ, दिल्ली-अहमदाबाद, दिल्ली-हैदराबाद अशा सेवांचाही समावेश आहे. दिवसभरात काही विमानतळांवरून दिल्ली, अहमदाबादसारख्या शहरांमध्ये जाणाऱ्या अनेक विमानसेवा असल्या तरी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी रद्द झालेल्या सेवांमुळे प्रवाशांना अधिक फटका बसेल असा अंदाज आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims