नाशिक: भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी अतिउष्णतेचा (हीटवेव्ह) इशारा दिला असून, नागरिकांनी उष्णतेबाबत आवश्यक खबरदारी घेऊन स्वतःचे व कुटुंबीयांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमी होत असून, बुधवारी (दि. २८) किमान तापमान २०.६, तर कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. येत्या काळात तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. या कालावधीत सूर्यप्रकाशाची तीव्रता अधिक असल्याने उष्माघाताचा धोका वाढतो. बाहेर पडणे अपरिहार्य असल्यास टोपी, स्कार्फ अथवा छत्रीचा वापर करावा, तसेच हलके, सैल व फिकट रंगाचे सूती कपडे परिधान करावेत, असे आवाहन प्रसाद यांनी केले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणाद्वारे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांना कोणतीही लक्षणे जाणवल्यास जवळच्या सरकारी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. तसेच, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नागरिकांनी पशुधन, पक्षी व प्राण्यांसाठी विविध सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे आवाहनही प्रसाद यांनी केले.
सरकारी रुग्णालयांत 'कोल्ड रूम'
राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून, नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये हीट स्ट्रोक व्यवस्थापन कक्ष तसेच 'कोल्ड रूम'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी केले आहे.
नागरिकांमध्ये उष्माघाताबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात 'उष्माघात प्रतिबंध व उपचार' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेला डॉ. प्रसाद खैरनार, डॉ. प्रज्ञा अहिरे, डॉ. मोहन वारके, डॉ. अविनाश गोरे, रुग्णालय अधीसेविका अनिता भालेराव यांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सिंगच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या वेळी डॉ. खैरनार यांनी उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. शरिरातील उष्णता नियंत्रण प्रक्रिया, उष्णतेमुळे होणारे बदल तसेच आवश्यक खबरदारीबाबत त्यांनी माहिती दिली.
'कामगारांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात'
बांधकाम, शेती व इतर मैदानी कामांमध्ये कार्यरत कामगारांसाठी संबंधित नियोक्त्यांनी कामाच्या ठिकाणी सावलीसह स्वच्छ पिण्याचे पाणी, तसेच पुरेशा विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. कामाची वेळ शक्यतो सकाळी व सायंकाळी ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
उष्माघाताची लक्षणे
चक्कर येणे
डोकेदुखी
मळमळ
अतितहान
लघवी कमी होणे
धाप लागणे व हृदयाचे ठोके वाढणे
उष्माघातावर उपाय
पुरेसे पाणी पिणे
बाहेर पडताना पाण्याची बाटली ठेवणे
ताक, लिंबूपाणी, लस्सी, 'ओआरएस' घ्यावे

